Assam Exit Poll 2026: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ साठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा एक्झिट पोलच्या निकालांकडे लागल्या आहेत. आज सायंकाळी ६:३० वाजल्यापासून विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे कल समोर येत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदा आसाममध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदानानंतर ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलने राज्याचे राजकीय समीकरण स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. मतदानाचा नवा विक्रम – निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये यंदा तब्बल ८५.२१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतील ८२.०४ टक्के मतदानाचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे दलगाव मतदारसंघात सर्वाधिक ९४.५७ टक्के मतदान झाले, तर अमरी भागात सर्वात कमी ७०.४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हेही वाचा – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक एक्झिट पोल, पहा कोण बनवणार सरकार मतदानाचा हा वाढलेला टक्का राज्यात एखाद्या मोठ्या राजकीय लाटेचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता हे भरघोस मतदान हिमंत बिस्वा सरमा सरकारला पुन्हा सत्तेत आणते की काँग्रेससाठी परिवर्तनाचे द्वार उघडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एक्झिट पोलचा अंदाज: कोणाचे पारडे जड? विविध सर्वेक्षणांनुसार आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. ‘ॲक्सिस माय इंडिया’ने भाजपला ८८ ते १०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असून काँग्रेसला २४ ते ३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ‘मॅट्रिझ’च्या अंदाजानुसार भाजप ८५ ते ९५ आणि काँग्रेस २५ ते ३२ जागांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तसेच ‘पोल डेअरी’ आणि ‘चाणक्य स्ट्रॅटेजीज’ या संस्थांनीही भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल दिला असून भाजपला ८६ ते १०१ पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. आसाम विधानसभेत एकूण 126 जागा असून बहुमतासाठी 64 जागा आवश्यक आहेत. हेही वाचा – तामिळनाडूच्या एक्झिट पोलने वेधले देशाचे लक्ष्य; पहा कोण स्थापन करणार सरकार २०२१ चा जनादेश – २०२१ च्या निवडणुकीत भाजपने ६० जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते, तर काँग्रेसला २९ जागांवर समाधान मानावे लागले होते. विकासाचा मुद्दा विरुद्ध परिवर्तनाची लाट – भाजपने या निवडणुकीत विकास आणि सुरक्षा या मुद्द्यांवर भर दिला होता, तर दुसरीकडे काँग्रेसने बदल आणि रोजगाराचे आश्वासन देत मतदारांना साद घातली आहे. आज सुरू झालेल्या एक्झिट पोलच्या महाकव्हरेजमुळे ४ मे रोजी लागणाऱ्या अधिकृत निकालांची एक स्पष्ट झलक पाहायला मिळणार आहे. सध्या तरी एक्झिट पोलची आकडेवारी पाहता सत्ताधारी भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र असून काँग्रेस पुन्हा मुसंडी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.