विधानसभेत मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख

मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन योजना आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यांसह शेतकऱ्यांचे तसेच बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न राहील.
विशेषत: आरोग्य खात्यातील कथित घोटाळा हा केंद्रस्थानी असण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे, संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराड, नामदेव ढसाळ यांच्यावरील चित्रपट, नीलम गोऱ्हे मर्सिडीज प्रकरण, पुणे बलात्कार प्रकरण हे मुद्देही विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित केल्या.
या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री अमित देशमुख यांची आणि सचिवपदी विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे.
त्याबरोबरच प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विधानपरिषदेत गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
दरम्यान, 3 मार्चपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन साडेतीन आठवडे म्हणजे 26 मार्चपर्यंत चालणार आहे. 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल.





