आळंदी पोलिस जनता दरबारात एकाच दिवशी 45 अर्जांवर निर्णय

आळंदी – पोलिसांनी मनात आणले तर काहीही होऊ शकते याची प्रचिती आज आळंदीत आली. पोलिस उपायुक्त परिमंडळ-1 मंचक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या जनता दरबारात आज (दि.7) एकाच दिवशी आळंदी पोलीस ठाण्यात तब्बल 45 अर्जावर निर्णय झाले. तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
स्वत: मंचक इप्पर यांनी पोलिस ठाण्यात हजर राहून अर्जदारांशी चर्चा केली. जनता दरबारला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. जमिनीचे वाद, आर्थिक फसवणूक, महिलांच्या तक्रारी यांसह विविध वादावर तोडगा काढण्यात आला.
यावेळी ठराविक वेळेनुसार यापुढेही आळंदी पोलिस ठाण्यात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले. आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गांगड, पोलिस उपनिरीक्षक जोंधळे, पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांसह तपासी अंमलदार यावेळी उपस्थित होते.





