Robbery Attempt : आळंदीत खळबळ! पहाटे ‘पॉलिबॉड’ कंपनीसमोर काय घडलं? पोलिसांनी उधळला मोठा कट
Robbery Attempt : आळंदी पोलिसांची पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई; कुदळवाडी परिसरातील गुन्हेगारी टोळीचे दरोड्याचे मनसुबे पोलिसांनी उधळले.

Robbery Attempt – आळंदी ते मरकळ रोडवरील पॉलिबॉड कंपनीसमोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन अल्पवयीन आरोपींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. १० एप्रिल) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
महंमद इब्राईम अनिस चौधरी (वय १९), जिशान महंमद सहिर सय्यद खान (वय १८), जमाल आशिक अली हाशमी (वय १९), शिवकुमार निरंजन चौव्हाण (वय १९) आणि सलमान जुबैर बागवान (वय १८, सर्व रा. कुदळवाडी, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यासोबतच तीन अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदीप लक्ष्मण दोडके यांनी शुक्रवारी (दि. १० एप्रिल) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास ही टोळी धानोरे गावच्या हद्दीत पॉलिबॉड कंपनीसमोर अंधारात दबा धरून बसली होती.
पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ मोबाइल फोन, चार कोयते, एक ‘छोटा हत्ती’ टेम्पो, एक स्प्लेंडर प्लस, एक ज्युपीटर, एक ॲक्टिव्हा आणि नायलॉनची रस्सी असा एकूण आठ लाख ४४ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





