प्रभागाला नव्याने जोडलेल्या भागात; भूमिपूजनांतून मतांची गोळाबेरीज

बिबवेवाडी (हर्षद कटारिया)- पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा काही भाग वगळण्यात आला असून नव्या रचनेनुसार अनेक प्रभागांना नवा भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागाला नव्याने जोडलेल्या भागात विद्यमान नगरसेवकांकडून मोठ्या विकासकामांची उद्घाटने तसेच अनेक कामांचे भूमीपूजन सुरू झाली आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चातूनही किरकोळ-चिरकोळ कामे सुरू केली आहेत.
महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना बदलल्याने अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारीही फिरली आहे. नव्या रचनेत अनेक प्रभागांना नवा भाग जोडण्यात आला आहे, त्यामुळे नव्याने जोडलेल्या भागातील मत मिळवण्यासाठी उमेदवारांना झगडावे लागणार आहे. यासाठीच प्रभागाला जोडलेल्या भागात विद्यमान नगरसेवकांकडून स्वत:च्या प्रभागाबरोबरच लगतच्या प्रभागातही विकासकामे करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, अशा भागात कामांसाठी तरतूद करण्यासाठी नगरसेवकांकडून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावाही सुरू आहे.
नगरसेवकांकडून प्रभागात विविध प्रकारची विकासकामे केली जातात, यासाठी अंदाजपत्रकात त्यांना निधी उपलब्ध होतो. आगामी निवडणुकीला काही महिने बाकी राहिल्याने डिसेंबर महिन्यापासूनच लहान मोठ्या कामांचे प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातूनही कामे करून घेण्यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत, त्यातच आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे नोव्हेंबर महिन्यात स्पष्ट झाल्यानंतर नगरसेवकांकडून प्रभागांची पुनर्रचना गृहीत धरून त्या भागातही कामे सुचिवण्यासह अगदी स्वखर्चातूनही कामे केली जात आहेत. प्रभाग रचना लक्षात घेत तसेच निवडणुकीसाठी काही दिवसांचा कालावधी राहिल्याने प्रभागात विकासकामे करण्यासाठीची धावपळ सर्वपक्षीय नगरसेवकांकडून सध्या सुरू आहे.
कामे पूर्ण करण्यावर भर…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागासाठी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून नगरसेवकांनी अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. यातील काही कामांना मंजुरी मिळाली असली तरी काही कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यामुळे आहे ती कामे पूर्ण करण्यावर भर देतानाच प्रभागाच्या नव्या भागातही काही निधी खर्च करता येतो का, यासाठी विद्यमान नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. तसेच, अंदाजपत्रकातील निधी परत जावू नये, यासाठीही नगरसेवक विविध कामांचे प्रस्ताव देत आहेत.




