Newborn Baby Death : ‘माझ्या चिमुरड्याला न्याय मिळालाच पाहिजे!’; पीडित मातेच्या सोशल मीडिया पोस्टने पुणे हादरले
Newborn Baby Death : मार्केट यार्ड येथील पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये सिझरियन प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा निष्काळजीपणाचा आरोप.

Newborn Baby Death – मार्केट यार्ड येथील पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला असून याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलला २४ तासांत सर्व कागदपत्रे, केस पेपर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची नोटीस हाॅस्पीटल प्रशासनाला दिल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डाॅ. सुर्यकांत देवकर यांनी सांगितले. एका गर्भवतीला प्रसूतीसाठी पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
डॉक्टरांनी त्यांच्यावर सी-सेक्शन (सिझरियन) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेबाबत एका महिलेने सोशल मिडियावर लिहले. त्याची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेत हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या घटनेबाबतची सर्व माहिती, रुग्णाचे केस पेपर, उपचाराचे तपशील आणि अन्य कागदपत्रे २४ तासांत आरोग्य विभागाकडे सादर करावी, अन्यथा हॉस्पिटलवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डाॅ. देवकर यांनी दिला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतरच बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सोशल मिडियावरील पोस्ट…
माझ्या निष्पाप बाळाच्या मृत्युला पुणे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलचे प्रशासन आणि डॉक्टरांचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. सिझेरियन प्रसूतीदरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके ११३ असतानाही त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने स्वतःची चूक लपवण्यासाठी हा मृत्यू २४ तासांपूर्वीच झाल्याचा खोटा दावा केला.
माझ्या बाळाच्या शरीरावर, हनुवटीवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. ३५ आठवडे पोटात वाढवलेल्या माझ्या चिमुरड्याला न्याय मिळालाच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी करून दोषी डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, हीच माझी आर्त हाक आहे.
– एक पीडित, दुःखी माता.





