Talegaon Dabhade – तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौक, खडक मोहल्ला या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण येत्या दसरा, दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर नोटीसा २७५ मालमत्ताधारकांना बजाविण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली. मावळचे आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, बांधकाम समितीचे सभापती सुदाम शेळके यांची व्यापाऱ्यांसमवेत १३ एप्रिल रोजी संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी हा रस्ता रुंद करण्याचे ठरविण्यात आले होते. या रस्त्यावर बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना नगरपरिषदेकडून तीनपट टीडीआर देण्याचे प्रशासनाने कबूल केले आहे. तळेगाव शहरातील ही मुख्य बाजारपेठ असून अरुंद रस्त्यामुळे येथील व्यवसायिकांच्या व्यापारावर परिणाम होत आहे. यास अनुसरून या रस्त्यालगत येणाऱ्या २७५ मालमत्ता धारकांना (दि. १२ मे ) नगरपरिषद प्रशासनाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येकाने आपले बाधित होणारे बांधकाम स्वतःहून काढून टाकावे असे आवाहन या नोटीसमध्ये करण्यात आले. रस्त्यालगतच गाड्या लागत असल्याने वाहतुक सुरळीत होत नाही. मारुती मंदिर चौकापासून तेली आळी, राजेंद्र चौक मार्गे खडक मोहल्ला, गणपती चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या बाजारपेठेमध्ये रस्त्यावर होलसेल किराणा दुकाने,कपड्याची दुकाने, सोन्याची दुकाने, स्टेशनरी जनरल स्टोअर, मेडिकल स्टोअर, सोन्याचे काम करणारी कारागिरांची दुकाने, उपहारगृह, कासार, केशकर्तनालय, दवाखाने असून साधारणपणे दोन फूट ते पाच फुटापर्यंत रस्ता रुंदीकरणांमध्ये बाधित होणार आहेत. बाधित व्यापाऱ्यांना टीडीआर मिळणार पहिला रस्ता सात ते साडेसात मीटरचा होता. नवीन रस्ता नऊ मीटरचा असणार आहे. बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोबदला म्हणून नगर परिषद प्रशासनाकडून टीडीआर मिळणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, नगर रचनाकार विश्वजीत कदम, सहाय्यक गणेश कोकाटे हे रस्ता रुंदीकरणाच्या कारवाई बाबत प्रयत्नशील आहेत. मालमत्ताधारकांनी रस्ता रुंदी करण्याच्या कामाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.