Newasa News : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग दुरुस्तीला गती; काँग्रेसच्या आंदोलनाला यश

नेवासा : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या खराब अवस्थेमुळे खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला होता. जागतिक बॅंकेच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास टाळे ठोकत धरणे आंदोलन करून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या आंदोलनाच्या यशस्वी लढ्यामुळे अखेर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. खडी आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरुस्तीसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची निविदा काढली असून, वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांत विभागले गेले आहे: अहिल्यानगर ते इमामपूर, इमामपूर ते घोडेगाव आणि घोडेगाव ते वडाळा. या कामाला आता गती मिळाली असून, कामाची गुणवत्ता राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संभाजी माळवदे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपअभियंत्यांकडे कामाची गती वाढवण्यासाठी तीन युनिटऐवजी पाच युनिटद्वारे काम करण्याची मागणी केली. तसेच, दीपावलीपूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गतीमुळे महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, परिणामी प्रवाशांचा मानसिक त्रास कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होईल. विशेषत: दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांना होणारा त्रास टळणार आहे.
या यशस्वी आंदोलनामुळे जिल्हाभरातील नागरिकांनी काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पाहणीवेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे युवा नेते हरीश चक्रनारायण, काँग्रेसचे संदीप मोटे, सुमित आदी उपस्थित होते.
“आता लढा मनमाड मार्गावरील वळवलेली वाहतूक बंद करण्यासाठी”
नागरिकांच्या प्रश्नासाठी काँग्रेसने सदैव आक्रमक भूमिका घेत प्रश्नांची सोडवणूक केली आहे. महामार्गाचे काम सुरु झाल्याने समाधान वाटले परंतु आता लढा मनमाड महामार्गाची वाहतूक अहिल्यानगर – संभाजीनगर महार्गांवर वळविली आहे ती बंद करण्यासाठी. लवकरच यासाठी रास्ता रोको करून ही वाहतुक बंद करणार
संभाजी माळवदे, प्रदेश काँग्रेस कमिटी.प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. काँग्रेसने घेतलेली भूमिका ही योग्य असून तिचे आम्ही स्वागत करतो मनमाड महामार्गाची वळवेलेली वाहतूक बंद करण्यासाठी मैदानात उतरणार
रावसाहेब काळे, अध्यक्ष छावा संघटना





