Newasa News : इमामपूर घाटाचे अखेर ‘ज्ञानेश्वरी घाट’ नामकरण; ‘पैस’ खांबाच्या देखण्या प्रतिकृतीचे वारकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण!
संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे महंत वेदांताचार्य ह.भ.प. देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढी वारीच्या (Newasa News) दरम्यान या घाटाचे नामकरण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Newasa News : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील प्रसिद्ध ‘इमामपूर घाटाला’ आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नवीन नाव मिळाले आहे. संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे महंत वेदांताचार्य ह.भ.प. देविदास म्हस्के महाराज यांनी गेल्या वर्षी आषाढी वारीच्या (Newasa News) दरम्यान या घाटाचे नामकरण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. माऊलींच्या कृपेने शनिवार (दि. ११) रोजी वारकऱ्यांच्या जनसमुदायामध्ये हा संकल्प साक्षात पूर्ण झाला.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून आणि यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने या घाटात (Newasa News) संत ज्ञानेश्वरांच्या स्मृती जागवणारी ‘पैस’ खांबाची भव्य प्रतिकृती आणि ‘ज्ञानेश्वरी घाट’ असा ठळक अक्षरांचा देखणा फलक उभारण्यात आला आहे.
हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा
शनिवारी या घाटाच्या नामकरण फलकाचा भव्य अनावरण सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज, ह.भ.प. उद्धव मंडलिक महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग, राम महाराज झिंजुर्के यांच्यासह हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, मुळा कारखान्याचे संचालक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
युवा नेते उदयन गडाख यांचे विशेष नियोजन
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनाची धुरा युवा नेते उदयन गडाख यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी या प्रकल्पात विशेष लक्ष घालत, घाटाच्या सौंदर्यात भर घालणारी ‘पैस’ खांबाची प्रतिकृती आणि ‘ज्ञानेश्वरी घाट’ अशी अक्षरे असलेला आकर्षक एलईडी (LED) फलक स्वतः तयार करून घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उदयन गडाख यांच्यासह यशवंत प्रतिष्ठानच्या (Newasa News) सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या नामकरणामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आणि प्रवाशांना आता माऊलींच्या ज्ञानेश्वरीची आणि भक्तीची प्रचिती येणार आहे.






