Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासे शहरात (Newasa News) सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Newasa News : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासे शहरात (Newasa News) सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेटे यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याचा आरोप करत या मोर्चात हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरले.
या मोर्चाला (Newasa News) संबोधित करताना प्रसिद्ध कीर्तनकार संग्रामबापू भंडारे, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनावर तसेच हल्लेखोरांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी सर्वसामान्य जनतेत बसून मोर्चात सहभाग नोंदवला.
मोर्चाला संबोधित करताना संग्रामबापू भंडारे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. जेव्हा हिंदूंचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सर्व संघटना बाजूला ठेवून ‘हिंदू का साथ, हिंदू का विकास’ हीच मुख्य भूमिका असायला हवी, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पडद्याआडून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.
शेटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या चौकटीत राहून जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रवृत्तींची पोलिसांनी धिंड काढली पाहिजे अशी मागणी केली. आपल्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला जातो, मात्र घडणाऱ्या अयोग्य घटनांना विरोध करणे हा गुन्हा नाही, असे स्पष्ट करत त्यांनी मोर्चातील जनसमुदायाचे कौतुक केले.
या वेळी आमदार संग्राम जगताप यांनीही संतांच्या (Newasa News) भूमीत झालेल्या या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला. संतांच्या पावन भूमीत अशा प्रकारची गुंडगिरी आणि बेकायदेशीर कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या संथ कारभारावर खरपूस टीका केली.
दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा विरोध कोणत्याही विशिष्ट समाजाला सरसकट नसून केवळ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या समाजकंटकांना आहे. महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि महिलांच्या सुरक्षेबाबत लवकरच कडक कायदे अमलात येतील, असे नमूद करत मंदिराच्या रस्त्यावरील अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणाऱ्या वादावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.






