Maharashtra News: बैलपोळा सणावर मंदीचं सावट! पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांची खरेदीकडे पाठ
Maharashtra News: चोपडा तालुक्यासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

Maharashtra News: चोपडा तालुक्यासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून, त्याचा परिणाम आता बाजारपेठेवरही जाणवू लागला आहे.
काही दिवसांवर बैलपोळा सण येऊन ठेपला असतानाही चोपडा शहरातील पोळ्याच्या साहित्याच्या बाजारात अपेक्षित खरेदीची लगबग दिसून येत नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरवर्षी बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य विक्री करण्यासाठी परराज्यातील विक्रेते चोपडा शहरात दाखल होतात. यंदाही अनेक विक्रेते बैलजोडीसाठी लागणारे साहित्य घेऊन शहरात आले आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी असल्याचे चित्र आहे.

आज आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बैलजोडीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची अपेक्षित लगबग दिसून आली नाही. बैलांना सजवण्यासाठी लागणारे विविध साहित्य, तसेच पोळ्याच्या सणासाठी आवश्यक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असल्या तरी ग्राहकांची संख्या तुलनेने कमी आहे.
पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी सध्या खर्च जपून करत आहेत. त्यामुळे पोळ्याच्या साहित्याच्या विक्रीवरही त्याचा थेट परिणाम होत आहे. दरवर्षी सणाच्या दिवसांत चांगली उलाढाल होत असते; मात्र यंदा ग्राहकांची वाट पाहावी लागत असल्याचे परराज्यातून आलेल्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पिकांना पावसाची प्रतीक्षा असतानाच बैलपोळ्याच्या बाजारपेठेवरही मंदीचे सावट आले आहे. त्यामुळे पाऊस लवकर बरसावा आणि शेतकऱ्यांसह बाजारपेठेलाही दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





