Nepal : नेपाळकडून प्रवासी मार्गदर्शक सूचना जारी; मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी
पुरामुळे सापडलेल्या बेवारस मृतदेहांची आणि मानवी अवशेषांची ओळख पटवण्यासाठी, नेपाळ पोलिसांनी बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Nepal – नेपाळमधील पूरग्रस्त भागांमध्ये प्रवास नकरण्याची सूचना आपल्या देशातील नागरिकांना देण्यात यावी, अशी विनंती नेपाळने आपल्या मित्र देशांना केली आहे. ज्या भागांमध्ये पूर येऊन गेला आहे, तो वगळता देशाचा अन्य भाग पर्यटन आणि प्रवास करण्यासाठी सुरक्षित असल्याचेही नेपाळने म्हटले आहे.
नेपाळचे परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील नेपाळची दूतावासे या मुद्द्यावर मित्र देशांसोबत मिळून काम करत आहेत, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले.
अमेरिकेने शुक्रवारीच नेपाळला प्रवास न करण्यासंबंधी श्रेणी ४ ची मार्गदर्क सूचना जारी केली आहे. नेपाळ-चीन सीमा ओलांडण्याच्या ठिकाणासह, रसुवा जिल्ह्यातील रसुवागढी-तिमुरे-स्याफ्रुबेसी परिसर श्रेणी ४ अंतर्गत निर्बंध ठेवण्यात आले आहेत, असे अमेरिकेच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यांशी संबंधित धोके, अस्थिर भूभाग, भूस्खलनाचा धोका आणि हेलिकॉप्टरची कार्यवाही लक्षात घेता ही मार्गदर्शक सूचना आवश्यकता होती, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
नेपाळमध्ये बचाव पथकांनी बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरूच ठेवला आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना मृतांची ओळख पटवण्यात सतत अडचणी येत आहेत. पूरामधील मृतांचा आकडा १,३४४ वर पोहोचला असून, ५८९ परदेशी नागरिकांसह जवळपास ५,००० लोक अद्याप बेपत्ता आहेत.
तर १३,४०० लोकांना वाचवण्यात यश आले आहे, असे नेपाळ पोलिसांनी म्हटले आहे. चीनच्या बाजूने किमान ४३ लोक ठार झाले, तर तिबेटमध्ये ५०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.
मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी
पुरामुळे सापडलेल्या बेवारस मृतदेहांची आणि मानवी अवशेषांची ओळख पटवण्यासाठी, नेपाळ पोलिसांनी बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळमधील नातेवाईक काठमांडू येथील नेपाळ पोलीस रुग्णालयामार्फत किंवा त्यांच्या जवळच्या जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत नमुने देऊ शकतात, असे आवाहन केले गेले आहे.
भविष्यात ओळख पटवणे सोपे व्हावे यासाठी डीएनए नमुने गोळा केल्यानंतर एक हजाराहून अधिक अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माध्यमाच्या प्रतिनिधींसाठी सुरक्षाविषयक नियमावली
पुरामुळे बाधित झालेल्या भागांना भेट देणाऱ्या पत्रकारांसाठी नेपाळने माध्यम सुरक्षा आणि कार्यप्रणाली नियमावली जारी केली आहे. तर पूरग्रस्त भागातून वार्तांकन करू इच्छिणाऱ्या परदेशी पत्रकारांना पत्रकार मान्यता मिळवावी लागेल. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने रविवारी कार्यप्रणालीचा आराखडा प्रसिद्ध केला.
तात्काळ या नियमावलीनुसार, पत्रकारांनी वैध पत्रकार ओळखपत्र बाळगणे, सुरक्षा आणि बचाव कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करणे, निर्धारित मार्गांचे आणि हालचालींवरील निर्बंधांचे पालन करणे, तसेच लागू असेल तेथे स्थलांतराच्या आदेशांचे पालन करणे या नियमावलीनुसार आवश्यक आहे.





