NZ beat India : टिम सेफर्टच्या वादळासमोर इशान-श्रेयसची खेळी व्यर्थ! न्यूझीलंडने १८ व्या ओव्हरमध्येच जिंकली मॅच; तरीही मालिका टीम इंडियाच्या खिशात
NZ beat India : पाचव्या टी२० सामन्यात टीम इंडिया टिम सेफर्टच्या वादळासमोर टिकू शकली नाही. त्याने ५० चेंडूंमध्ये ९३ धावांची आणि ग्लेन फिलिप्सने ३८ चेंडूंमध्ये नाबाद ६५ धावांची खेळी साकारली.

New Zealand Defeat India By 7 Wickets 5th T20 Series Decided 3-2: न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या लढतीत भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा धक्का बसला आहे. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १९१ धावा उभारल्या होत्या. विजयासाठी मिळालेले १९२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १८ व्या षटकात ३ गडी गमावून सहज पूर्ण केले. पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाने ही पाच सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे.
सेफर्ट-फिलिप्सची तुफान फटकेबाजी –
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात फिन ॲलनला (२) बाद केले. डॅरिल मिचेल आणि टिम सेफर्ट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने नवव्या षटकात मिचेलला बाद करून भारताला दिलासा दिला. मिचेलने १६ चेंडूंमध्ये चार षटकारांसह २९ धावा केल्या. सेफर्टने ग्लेन फिलिप्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सेफर्ट (९३) आपले पहिले टी२० आंतरराष्ट्रीय शतक सहजपणे पूर्ण करेल असे वाटत होते, पण १६ व्या षटकात नितीश कुमार रेड्डीने त्याला बाद केले. त्यानंतर फिलिप्सने (६५) न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
आघाडीची फळी ढेपाळली; इशान-श्रेयसची ९३ धावांची भागीदारी –
New Zealand win the final game of the series, with Tim Seifert leading the run chase! 🔥
India had already sealed the series, but New Zealand win the final game to finish the series 3-2!
#NZvsIND https://t.co/LBxZj6B7E1
— CREX (@Crex_live) November 1, 2026
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघी १ धाव करून तंबूत परतला, तर संजू सॅमसन १० चेंडूंत ४ धावा काढून बाद झाला. अवघ्या १९ धावांवर २ गडी गमावल्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी अवघ्या ४३ चेंडूंत ९३ धावांची तुफानी भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले.
किशन अन् अय्यरची वादळी अर्धशतके; तिलक वर्मा पुन्हा अपयशी
इशान किशनने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या २८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६१ धावांची खेळी साकारली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही त्याला तोडीस तोड साथ देत २२ चेंडूंत फिफ्टी ठोकत २३ चेंडूंत ५० धावा फटकावल्या. मात्र, मधल्या फळीत तिलक वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ ६ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांत नमन धीर (२३ चेंडूंत ३३ धावा) आणि नितीश कुमार रेड्डी (१७ चेंडूंत २२ धावा) यांनी ३० चेंडूंत ४६ धावा जोडून धावसंख्या १९१ पर्यंत नेली. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ॲडम मिल्नेने भेदक मारा करत ४ षटकांत अवघ्या १९ धावा देत ४ विकेट्स घेतले, तर ब्लेअर टिकनर आणि नेथन स्मिथ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





