नव्या प्रकल्पांना पाहिजे मान्यतेचा ‘बूस्टर’

पुणे – यंदा आधी लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका. यामुळे वर्षातील सुमारे साडेचार महिन्यांचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये गेला. याचा फटका बसून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना अपेक्षित गती मिळाली नाही. त्यामुळे रिंगरोड आणि खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्प या प्रकल्पांना मंजुरी मिळूनही वर्क आॅर्डर अथवा अन्य तांत्रिक मान्यतेच्या फेऱ्यात हे प्रकल्प अडकले.
आता राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार विराजमान होत आहे. त्यांच्या काळातील रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आणि पुरंदर विमानतळ आदी मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता वेगाने पुढे सरकण्याची अपेक्षा आहे. यातील काही प्रकल्पांचे येत्या दोन-तीन महिन्यांत भूमिपूजन होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार हे महायुतीचेच असल्याने आता प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पुरंदर विमानतळ ठरणार भूसंपादनाचे मॉडेल
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जुन्याच जागी म्हणजे पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी, वनपुरी, एखतपूर आणि कुंभारवळण या गावांच्या हद्दीतच होणार आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ॲथॉरिटी, संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखविला आहे.
आता फक्त भूसंपादन कोणी करायचे आणि भूसंपादनापोटी मोबदला काय द्यायचा यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहे. जागेचे भूसंपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी की एमआयडीसी यांनी करावयाचा, यावर देखील चर्चा होऊन अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंक
मुंबई व पुणे ही दोन्ही शहरांमधील अंतर कमी करून प्रवासाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्र्कल्पाचे काम गतीने सुरू आहे. याप्र्कल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
तर दरी पूलाचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. या मिसिंग लिंकचे काम येत्या दोन ते तीन महिन्यांत पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने ठेवले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
खडकवासला ते फुरसुंगी बोगदा
पुणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध करून देणारा आणि शेतीलाही पुरेशा पाणी पुरवठा करणे शक्य होणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून निविदाही काढण्यात आली आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन होणे बाकी आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी येण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली.
या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून ते सर्व पाणी गुरूत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. तर अतिरीक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
रिंगरोड प्रकल्प
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आला आहे. पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंगरोड असे दोन भाग करण्यात आले आहे. पूर्व रिंगरोड हा सुमारे 72 कि.मी. तर पश्चिम रिंगरोड हा सुमारे 66 कि.मी लांबीचा असणार आहे. तर रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. सद्यस्थितीत या रिंगरोडसाठीचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आहे. तर उर्वरित भूसंपादनही आता पूर्ण करण्यात येईल.
एमएसआरडीसी पुणे रिंगरोड लिमिटेड (एमपीआरआरए) नावाची कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही भागाचे नव्वद टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच या कंपनीच्या माध्यमातून ठेकेदार कंपन्यांना वॅक ऑर्डर दिली जाणार आहे. त्यामुळे भूसंपादनानंतर येत्या काही महिन्यात या प्रकल्पाचेही भूमिपूजन करून प्रत्यक्षात काम सुरू करण्याचा सरकार प्रयत्न असणार आहे.





