नवीपेठ, पर्वती, दत्तवाडी करोनाचे नवे हॉटस्पॉट

सक्रीय बाधितांचा आकडा 450 वर
पुणे – शहरात अनलॉक-1 सुरू होताच करोनाचे हॉटस्पॉट बदलणे सुरू झाले आहे. त्याच वेळी सर्वाधिक बाधित असलेले भवानीपेठ आणि ताडिवाला रस्ता परिसरातील सक्रीय बाधितांची संख्या 100 च्या खाली आहे. तर, डेक्कन जिमखाना आणि मॉडेल कॉलनी प्रभागात ही संख्या 200वर गेली आहे. तर, सध्या सर्वाधिक बाधित नवीपेठ-पर्वती-दत्तवाडीत असल्याचे समोर आले आहे.
स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरातील 24 जूनअखेरची 42 प्रभागांमधील करोना बाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. शहरात पहिला करोनाबाधित आढळल्यानंतर सुरूवातीला परदेशांतून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या काही ठराविक भागातील व्यक्तीच करोनाबाधित होत होत्या.
मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या संसर्गाने भवानीपेठ, कासेवाडी, ताडिवाला रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, तसेच कळस-विश्रांतवाडी भागात पाय पसरले. त्यानंतर जवळपास दोन महिने या भागातच मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आले. लॉकडऊन शिथिलतेस सुरूवात झाल्यानंतर नवीन हॉटस्पॉट निर्माण होत आहेत.




