पुणे | रिंगरोडसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी ९१२ हेक्टरवर नव्याने आठ नगर रचना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित असलेल्या रिंगरोडची जागा ताब्यात घेण्यासाठी प्राधिकरण टीपी स्कीम मॉडेल राबवित आहेत.
आता रिंगरोडसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी ९१२ हेक्टर जागेवर नव्याने आठ नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यास राज्य सरकारने प्राधिकरणास मान्यता दिली आहे.
म्हाळुंगे, माण नगर रचना योजनेच्या (टीपी स्कीम) धर्तीवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यात २० नगर नियोजन योजना प्रस्तावित केल्या आहेत. या सर्व योजना आराखड्यात सुचविण्यात आलेल्या ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुचविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आराखडा अंतिम झाल्यानंतर या योजनांवर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून यापूर्वीच सहा टीपी स्कीम प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत, असे असताना नव्याने आठ नगर रचना योजना प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत या योजनांना राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच या नगर रचना योजनांचा इरादा प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीतील धामणे या गावात दोन तसेच गोंडूंबरे, दारूंबरे, सोलुब्रे या गावांमध्ये तीन, तर सांगवाडे, नेरे आणि बावधन बुद्रूक अशा आठ ठिकाणी या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या सर्व नगर रचना योजना प्रस्तावित रिंगरोडच्या बाजूने आहेत. या योजना पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत.





