भाजपचा नवा अध्यक्ष लवकरच निश्चित; बिहार निवडणूक घोषणेआधी निवड शक्य
नवी दिल्ली – भाजपला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची चिन्हे आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी त्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकेल. त्यामुळे पुढील महिन्यात पक्षाच्या अध्यक्ष पदाविषयीचा सस्पेन्स संपणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ याआधीच समाप्त झाला आहे. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड काहीशी लांबली आहे. मात्र, आता नव्या अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला भाजप गती देणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
बिहार राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या राजकीय रणसंग्रामाची घोषणा होण्याआधी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक (९ सप्टेंबर) होईल. त्या निवडणुकीनंतर तातडीने भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली होतील.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या देशभरातील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून अध्यक्ष निवडीविषयी व्यापक विचारविनिमय केला. त्यातून काही संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे समजते. त्या नावांवर उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर अंतिम चर्चा होईल.
त्यानंतर भाजप अध्यक्ष निवडीसाठीचे औपचारिक वेळापत्रक जाहीर करेल. बिहार पाठोपाठ पुढील वर्षी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या अध्यक्ष निवडीचे महत्व आणखीच वाढले आहे.





