मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी व सोमवारी जिल्ह्यात : ना शिंदे
नगर – ज्या जागांवर कधीच शिवसेना व भाजपचा उमेदवार विजयी झाला नाही. परंतु आता तेथील अन्य पक्षातील विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आहेत. ती जागा भाजपला सोडली जाणार आहे. विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप महायुती म्हणून एकत्रित लढणार असून नव्याने पक्षप्रवेश होत असल्याने यावेळी महायुतीमध्ये जागावाटपात नवा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 25 व 26 ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी खा. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. शिवाजी कर्डीले, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, माजीमंत्री बबनराव पाचपुते आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ना. शिंदे म्हणाले की, महायुतीमध्ये नव्याने जागावाटपाचा फॉम्युला ठरणार आहे.त्यामुळे अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठ चर्चा करीत असून ते याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राहाता, अकोले या दोन्ही जागांबरोबर संगमनेरची जागा भाजपकडे येण्याची शक्यता आहे. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात 25 व 26 ऑगस्टला येत आहे. 25 तारखेला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन राधाकृष्ण विखे यांची सांत्वन भेट घेणार आहेत. यानंतर अकोल्यात दुपारी 2 वाजता महाजनादेश सभा होणार. 3 वाजता संगमनेर येथे मालपाणी लॉनमध्ये सभा होईल. राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एमआयडीसी येथे भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत. शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आल्यावर सायंकाळी सात वाजता गांधी मैदानात त्यांची सभा होणार आहे.
25 तारखेला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगृहावर मुक्कामाला थांबणार आहेत. 26 ला ते महाजनादेश यात्रा पाथर्डीकडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे 11.30 वाजता सभा होणार आहे. मात्र त्याआधी भिंगार, करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टीला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. महाजनादेश यात्रा शिवसेनेच्याच मतदारसंघातून जात आहे, याकडे लक्ष वेधले असता राम शिंदे यांनी ही यात्रा महायुतीची आहे. त्यामुळे शिवसेना देखील यात सहभागी आहेच असं म्हटलं आहे.