नेवासा: नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी केला नगरपंचायतीचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी

नेवासा – नेवासा येथील नगरपंचायतीमध्ये प्रशासक “राज” अस्तित्वात आल्यापासून प्रशासकिय अधिकारी केवळ नियमांचा कांगावा करून येथील अधिकारी व कर्मचारीवर्ग सामान्य नागरिकांना प्रंचड वेठीस धरुन शास्ती सारख्या कराच्या थकबाकीवर वर्षाला २४ टक्के सक्तीच्या वसूलीचा नियम दाखवून परस्पर कुठलीही नोटीस न देता सर्वसामान्य खातेदारांना सरसकट लागू केलेला आहे.
नगरपंचायतीच्या अखत्यारीतील कुठलेही काम “लक्ष्मीदर्शन” झाल्याशिवाय प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी करत नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराला सर्वसामान्य नागरीक प्रचंड वैतागलेले आहे. याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवार (दि.३) रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत प्रशासनाला तिलांजली देऊन प्रतिकात्मक नगरपंचायतीचा दशक्रिया विधी कार्यक्रम नेवासेकरांनी करुन गैरकारभाराचा भांडाफोड करत तिव्र निषेध व्यक्त केला.
या प्रतिकात्मक अनोख्या दशक्रिया विधी आंदोलनाचे नेत्तृत्व ‘मी नेवासकर’ या संघटनेचे शांताराम गायके, विकास चव्हाण यांच्या नेत्तृत्वाखाली शनिवारी करण्यात आले. या आंदोलनाला समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, नगरसेवक अल्ताफ पठाण, नगरसेवक रणजीत सोनवणे, नगरसेवक संदीप बेहळे, नगरसेवक राजेंद्र मापारी, युवा नेते मिलिंद नागे, शिवा राजगिरे, ज्येष्ठ नागरिक राम्हूशेठ पठाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, अमृत फिरोदिया तसेच ठेकेदार डेविड साळवे आदिंनी या आंदोलनाला जाहिर पाठिंबा यावेळी दिला.
गरीब नागरिकांना कामानिमित्त अनेकवेळा हेलपाटे घालावे लागतात. केवळ टक्केवारी मिळावी म्हणून नगरपंचायत अंर्गत बऱ्याच इमारतींचे प्रस्ताव घाईघाईने व जनमत विचारात न देता मंजूर करण्याचा सपाटा चालवला आहे, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी करुन या लोभापाई नगरपंचायतीची मुख्य इमारत शहरापासून दोन किलोमीटर लांब हलवण्याचा घाट घातला जात असल्याचे सांगितले.
नेवासा शहरातील नदीपात्रात दुथडी भरून तुडुंब पाणी असताना नेवाशातील नागरिकांना आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. तसेच स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजलेले आहेत. शहरात मोकाट जनावरे व शहरातील अस्वच्छतेमुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर अधिकारी फक्त पगारापुरते काम करण्यात व पालिकेचा मलिदा खाण्यात दंग झाल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.
सामान्य नागरीकांचे नगरपंचायत कार्यालयात अनेकदा चर्चा करून प्रश्न सुटत नाहीत तसेच ढिम्म अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी गांभीर्य उरलेले नाही, त्यामुळे शनिवारी (दि.३) राजी सकाळी १० वाजता नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत प्रतिकात्मक नगरपंचायतीचा दशक्रिया विधी करुन आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात व्यापारी बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





