नेवासा: हॉटेलमध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

नेवासा – नेवासा शहरातील बसस्थानकासमोरील जयभवानी हॉटेलमध्ये बेकायदा दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी (९ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे नेवासा पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या फौजफाट्यासह हॉटेलवर छापा टाकला. तिथे देशी-विदेशी दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला.
दारू साठा जप्त करत असताना हॉटेल चालक कैलास पोपट जीरे याने पोलिसांना धक्काबुक्की करत, “बाटल्या घेऊ नका, केस केली तर पाहून घेईन,” अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणत त्याने गैरवर्तन केले. खाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी पाटील, साठे, गवळी, भवार, दहिफळे यांनी कारवाई सुरू ठेवली.
दारूचा साठा पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही जीरे याने गोंधळ घातला. अखेर नेवासा पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत तुरुंगात रवाना केले. हा प्रकार नेवासा शहरात चर्चेचा विषय ठरला. बेकायदा दारू विक्रीबरोबरच पोलिसांशी पंगा घेण्याचा हा प्रयत्न जीरे याला चांगलाच महागात पडला. पोलिसांनी कठोर पावले उचलत त्याला धडा शिकवला. आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.





