नेवासा: भेंड्यात पोलिसांकडून हॉटेल चालक, महिलांना अमानुष मारहाण; निलंबनाची मागणी

नेवासा : नेवासा-शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा येथील हॉटेल अमितवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (७ मे) दुपारी धाड टाकून हॉटेल चालक महेश वाघडकर आणि कामगार महिलांना ‘तू दारू विकतोस’ असा आरोप करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत वाघडकर, कामगार महिला गंभीर जखमी झाले. जखमींवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर संतप्त गावकऱ्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी दुपारी एक वाजता पांढऱ्या गाडीतून आलेल्या साध्या गणवेशातील तीन पोलिसांनी हॉटेलात शोधाशोध सुरू केली. वाघडकर यांनी ‘तुम्ही कोण?’ अशी विचारणा केल्यावर एकाने वाघडकर यांच्या कानशिलात मारली आणि सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून मारहाण सुरू केली. एका पोलिसाने ‘१५ दारूच्या बाटल्या दे’ अशी धमकी दिली. वाघडकर यांनी दारू विक्रीचा इन्कार केला असता, पोलिसांनी त्यांच्यासह मध्यस्थी करणाऱ्या कुटुंबीयांना आणि मारहाण सोडवणाऱ्या महिलांना मारहाण केली.
वाघडकर कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन संबंधित पोलिसांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच, राज्य महिला आयोगात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे. पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.






