Dnyaneshwari Jayanti : 9 हजार 33 दिव्यांच्या प्रकाशात 90 सेकंदांत ज्ञानेश्वरी पारायण; नेवासा येथे भव्य सोहळा
Dnyaneshwari Jayanti : नेवासेत २ ऑक्टोबरला ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ९३३ वाचकांकडून ९० सेकंदांत ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रयत्न होणार आहे. यावेळी ९ हजार ३३ दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे.

Dnyaneshwari Jayanti : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा येथे २ ऑक्टोबरला ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त आयोजित सोहळ्यात ९ हजार ३३ दिव्यांच्या प्रकाशात अवघ्या ९० सेकंदांत संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ज्ञानेश्वरी ग्रंथातील ९ हजार ३३ ओव्यांनुसार ९३३ वाचक एकत्र बसून पारायण करणार आहेत. प्रत्येक वाचकाला १० ओव्या वाचनासाठी दिल्या जाणार आहेत. एका ओवीसाठी एक दिवा याप्रमाणे ९ हजार ३३ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे.
सोहळ्याच्या नियोजनासाठी संस्थानच्या वतीने बैठक घेण्यात आली असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पायी दिंड्यांसह हजारो भाविक नेवासा येथे येण्याची शक्यता आहे.
२ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता भाविकांचे मंदिरात आगमन होईल. त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचकांचे मनोगत आणि दुपारी ४ ते ५.३० या वेळेत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता मुख्य पारायण आणि दीपोत्सव होईल. सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि निरंजन सोबत आणावे, असे आवाहन संस्थानने केले आहे.





