Aditya Thackeray: MPSCची आणखी एक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; आदित्य ठाकरेंनी आभार मानत केली मोठी मागणी
MPSC Mains Paper 2026 Postponed: नव्या परीक्षेची तारीख जाहीर नाही

Aditya Thackeray : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३ ऑक्टोबर २०२६ पासून आयोजित केलेल्या विविध मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
अनेक विद्यार्थांनी आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२५ मधील मुल्यांकनाबाबत आक्षेप नोंदविले होते. हे आक्षेप विचारात घेऊन अखेर राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
आयोगाच्या निर्णयावर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तात्काळ घ्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, “महाराष्ट्रभरातील युवकांची जी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांसमोर ठेवली होती, ती मान्य करुन राज्य सेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार! आता ह्याच निर्णयाप्रमाणे राज्य सेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तत्काळ घेतला जाईल अशी आशा करतो.”
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय म्हंटले?
अनेक विद्यार्थी संघटना/विद्यार्थी यांनी आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 मधील मुल्यांकनाबाबत आक्षेप नोंदविलेले आहेत. सदर आक्षेप विचारात घेऊन राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे सदर परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे
राज्यातील प्रचलित सर्व परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने राज्यभरातील अनेक परीक्षार्थी व इतर संबंधितांशी विस्तृत चर्चा करून तसेच उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत.
या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी दिनांक 3 ऑक्टोबर, 2026 पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी, अशा आशयाची निवेदने आयोगास प्राप्त झालेली आहेत.
वरील सर्व बाबींचा आयोगाने साकल्याने विचार करून, दिनांक 3 ऑक्टोबर, 2026 पासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असं आयोगानं म्हटलं. दरम्यान, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी आयोगाने नव्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही.
हेही वाचा:
Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी





