Nevasa Crime : फिल्मी स्टाईल पाठलाग आणि जीवघेणा हल्ला; टेम्पोने गोरक्षकांच्या दुचाकीला उडवलं, आरोपी अटकेत
Nevasa Crime : दोन गोरक्षकांच्या मोटारसायकलला मुद्दाम धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Nevasa Crime – गायींच्या वाहतुकीचा संशय आल्याने आयशर टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या दोन गोरक्षकांच्या मोटारसायकलला मुद्दाम धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ८ मार्च रोजी फिर्यादी संकेत सोमनाथ हराळे (रा. चांदा, ता. नेवासा) व त्याचा मित्र सार्थक केळगेंद्र हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना आयशर टेम्पोमध्ये गायींची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला.
घोडेगाव शिवारातील भारभोडी पुलाजवळ टेम्पो व क्रेटा कारने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.याप्रकरणी संकेत हराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान १० मार्च रोजी गुप्त माहितीच्या आधारे गजराज नगर चौक येथे सापळा रचून MH-16-DC-9286 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार अडविण्यात आली. त्यातील फैजान अय्याश शेख (वय २४) व बबलू उर्फ असिम नजीर अहमद शेख (वय ३०दोघे रा. बायजाबाई जेऊर, ता. जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी मोटारसायकलला आयशर टेम्पो व क्रेटा कारने पाठीमागून धडक दिल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात अनिष इलियास कुरेशी (रा. बायजाबाई जेऊर), दानिश जाकीर शेख उर्फ कुरेशी (रा. चांदा, ता. नेवासा) तसेच आयशर टेम्पो चालक शरीफ (रा. सुरत) हे सहभागी असून ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे चार लाख रुपये किंमतीची क्रेटा कार जप्त केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.





