Pune Crime : पोलीसही असुरक्षित! गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला त्याच्याच काठीने बेदम मारहाण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरात वादावादीतून होणाऱ्या मारहाणीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशाच वादातून मध्यरात्री पोलिसालाच त्याच्याच काठीने बेदम मारहाण झाली आहे.ही गंभीर घटना मध्यरात्री विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली असून त्यात गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.अमोल काटकहा पोलीस या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. काटकर हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये नियुक्तीस आहेत.
मध्यरात्री एकच्या सुमारास ते कामावरुन घरी निघाले होते. विधी महाविद्यालय रस्त्यावर त्यांच्या दुचाकीची एका दुचाकीला मागून धडक बसली. यामध्ये त्यांच्यासह समोरील दुचाकीवरील दोघेही खाली पडले.यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. पडलेल्या दुचाकीस्वारांसोबत आणखी एका दुचाकीवर दोघे साथीदार होते. त्यांनी काटकर यांना शिवीगाळ केल्याने वाद वाढला. यानंतर काटकर यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
तसेच त्यांच्या गाडीला लावलेल्या काठीनेच बेदम मारहाण केली. यामध्ये काटकर यांचा कान फाटला आहे. गंभीर जखमी झाल्याने काटकर यांना तातडीने डेक्कन जिमखाना भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पसार झालेला दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराचा शाेध घेण्यात येत आहे.शहरात पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
दीड वर्षात शहरात वेगवेगळ्या घटनेत ३६ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हडपसर भागातील कृष्णानगर भागात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटात लाथ मारण्याची घटना घडली होती. पुणे स्टेशन परिसरात नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्यात आली होती.





