Kasarwadi Accident : कासारवाडी पुलावर भीषण अपघात; आयशर ट्रकच्या धडकेत ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Kasarwadi Accident : धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार; दापोडी पोलिसांकडून अनोळखी चालकावर गुन्हा दाखल.

Kasarwadi Accident – बेदरकारपणे ट्रक चालवून एका मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास कासारवाडी येथील ओव्हर ब्रिजवरील बीआरटी स्टॉपजवळ घडली.पूजा रोशन ठोंबरे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वैभव सुभाष ठोंबरे (वय ३२, रा. बग्गा कॉलनी, ओझर, जि. नाशिक) यांनी रविवारी (दि. ७) दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एका अनोळखी आयशर ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईक प्रशांत शिंदे हे त्यांच्या मोटारसायकलवरून मेव्हणी आणि पुतणीसह जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादीची वहिनी पूजा रोशन ठोंबरे यांचा मृत्यू झाला, तर प्रशांत शिंदे आणि लहान मुलगी किमया हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. दापोडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.





