Netanyahu Counters JD Vance : “इस्रायलला भारताचा मोठा पाठिंबा” ; अमेरिकेच्या टीकेला नेतान्याहूंचे प्रत्युत्तर
Netanyahu Counters JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी इस्रायलला अमेरिकेवर टीका न करण्याचा सल्ला दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचा विशेष उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे.

Netanyahu Counters JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी इस्रायलला अमेरिकेवर टीका न करण्याचा सल्ला दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचा विशेष उल्लेख करत प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलला भारतातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला.
वान्स म्हणाले होते, “सध्याच्या परिस्थितीत इस्रायलचा सर्वात मोठा आणि प्रभावी मित्र अमेरिका आहे. मी इस्रायली मंत्रिमंडळात असतो, तर त्या एकमेव शक्तिशाली मित्रावर कधीच टीका केली नसती.” त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नेतान्याहू म्हणाले, “आमचे इतरही मित्र आहेत. उदाहरणार्थ भारत – १.४ अब्ज लोकसंख्या असलेला देश. भारतात आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.”
बेंजामिन नेतान्याहू यांनी पुढे सांगितले की, भारतातून सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर, इस्रायलला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. “माझ्या फेसबुक अकाऊंटवर मला भारतातून भरभरून पाठिंबा मिळतो. माझे अनेक समर्थक तिथे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ (Netanyahu Counters JD Vance )
भारत आणि इस्रायलमधील संबंध गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिन्यामिन नेतान्याहू यांच्यातही जवळचे वैयक्तिक संबंध असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यावर्षीच्या सुरुवातीला नेतान्याहू यांनी मोदी यांचा “वैयक्तिक मित्र” असा उल्लेख करत भारताला उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हटले होते.
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा अधिकृत दौरा केला होता. त्या वेळी भारत इस्रायलच्या सुरक्षेसोबत ठामपणे उभा असल्याचा संदेश त्यांनी दिला होता. या दौऱ्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केले. त्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र होत पूर्ण युद्धाच्या स्वरूपात बदलला.
युद्धबंदीवरून अमेरिका-इस्रायलमध्ये मतभेद (Netanyahu Counters JD Vance )
इराणविरोधातील लष्करी कारवाईदरम्यान अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे हल्ले केले. मात्र, या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि इतर देशांवरही होऊ लागल्याने अनेक राष्ट्रांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. त्यानंतर अमेरिकेने इराणसोबत युद्धबंदीचा करार केला.
मात्र, या युद्धबंदीबाबत इस्रायलने नाराजी व्यक्त केली. इस्रायलमधून अमेरिकेच्या भूमिकेवर टीका होऊ लागल्यानंतर जे. डी. वान्स यांनी इस्रायलला सार्वजनिकपणे फटकारले. त्यानंतरच नेतान्याहू यांनी भारतासारखे इतरही मजबूत मित्र इस्रायलच्या पाठीशी असल्याचे सांगत अमेरिकेच्या टीकेला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले.






