Benjamin Netanyahu : नेतान्याहू यांच्या विरोधात ‘हे’ दोन माजी पंतप्रधान एकत्र
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात दोन माजी पंतप्रधानांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

Benjamin Netanyahu – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात दोन माजी पंतप्रधानांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
नेफ्ताली बेनेट आणि येर लापिड या दोन्ही माजी पंतप्रधानांनी २०२१ मध्ये आघाडी सरकार स्थापन केले आणि नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला उलथवून टाकले होते. दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानपद आलटून पालटून घेण्याचे मान्य केले होते.
बेनेट हे पहिल्या वर्षी पंतप्रधान झाले होते. नंतर त्यांच्यातील आघाडीफुटली. त्यानंतर उर्वरित ६ महिन्यांसाठी येर लापिड हे काळजीवाहू पंतप्रधान बनले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नेतान्याहू पुन्हा विजयी झाले होते.
आता याच दोन्ही नेत्यांनी नेतान्याहू यांचा पराभव करण्यासाठी आपापले पक्ष विलीन करून बेनेट यांच्या नेतृत्वाखाली एकच मोठा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपापसातील मतभेद संपवून आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे लापिड यांच्या येश अतिड पार्टीने निवेदनात सांगितले. बेनेट आणि लापिड यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.





