नेट परीक्षा होणार 18 जूनला

पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही नेट परीक्षा येत्या 18 जूनला घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
नेट परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून सकाळी 9.30 ते 12.30 या पहिल्या सत्रात तर दुपारी 3 ते 6 वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. यंदाची नेट परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर स्लिप प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती देखील जाहीर केली आहे.
त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजेच 8 जूनला उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा सिटी स्लिपद्वारे उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळवू शकतात. त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची तयारी करू शकतात. नेट परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत सकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन एनटीएने केले आहे.





