पुणे : विविध महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक राज्यातील विद्यापीठातील मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीन दिला आहे. समितीच्या वतीने प्राध्यापक भरतीसाठी पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त असताना बहुतांश ठिकाणी पात्र उमेदवारांना तासिका तत्त्वावर सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केले जात आहे. त्यामुळे नेट सेट धारक व पीएचडीधारकांवर अन्याय होत आहे. वारंवार मागणी करूनही शासन त्याकडे दूर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने पुढील दोन महिन्यात प्राध्यापक भरतीचा अध्यादेश काढला नाही, तर ,बहिष्कार टाकणारे प्राध्यापक परीक्षेचे मूल्यमापन, पर्यवेक्षण किंवा इतर कोणत्याही कामात सहभाग घेणार नाहीत असा दावा समितीचे राज्य समन्वयक प्रा.यशवंत खैरनार यांनी केला आहे.