Pune : दुसऱ्यांदा पीएच.डी. करणाऱ्यांना “कोर्सवर्क’ची सवलत

पुणे : पीएच.डी. अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना रीसर्च मेथोडोलॉजी, रीसर्च पब्लिकेशन एथिक्स कोर्सवर्क हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दुसऱ्यांदा पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्सवर्क पूर्ण करण्यातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात परिपत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी प्रसिद्ध केले आहे. पीएच.डी. उमेदवारांना त्यांचे संशोधन कार्यक्षम पद्धतीने करता येण्यासाठी रीसर्च मेथडॉलॉजी हे कोर्सवर्क पूर्ण करावा लागतो. तर शोधनिबंध प्रकाशनासंदर्भातील जागृती करण्यासाठीचे मार्गदर्शन रीसर्च पब्लिकेशन एथिक्स या कोर्सवर्कमध्ये केले जाते. यूजीसीच्या नियमानुसार ही दोन्ही कोर्सवर्क पीएच.डी. उमेदवारांना पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, एका विषयात पीएच.डी.प्राप्त विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयात पीएच.डी. करायची असल्यास त्यांना रीसर्च मेथडॉलॉजी कोर्सवर्क पूर्ण करण्यातून सूट देण्यात येत आहे. तसेच पहिली पीएच.डी. करताना त्यांनी रीसर्च पब्लिकेशन एथिक्स हे कोर्सवर्क पूर्ण केले असल्यास त्यांना रीसर्च पब्लिकेशन एथिक्स हे कोर्सवर्क पूर्ण करण्यातूनही सूट देण्यात येत आहे.
तसेच इतर मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.फिल. तसेच प्रथम पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पेट, कोर्सवर्कमधून सूट मिळण्याबाबत २०२२मधील परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.





