सरकारच्या तिजोरीत मोठी भर, कर संकलनात झाली तब्बल ‘एवढी’ वाढ

Direct tax collection: देशाच्या कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर 16 टक्क्यांनी वाढून 17 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एकूण कर संकलनात 20 टक्के वाढ पाहायला मिळाली. हा आकडा एप्रिल 2024 ते 12 जानेवारी 2025 पर्यंतचा आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सद्वारे (CBDT) ही माहिती देण्यात आली आहे.
सीबीडीटीद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2024 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 15.9 टक्क्यांनी वाढून 16.90 लाख कोटींवर पोहोचले आहे. तर याच कालावाधीत एकूण कर संकलन 19.9 टक्क्यांनी वाढून 20.64 लाख कोटींवर पोहोचले आहे.
तसेच, सरकारद्वारे 3.74 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर परतावा जारी करण्यात आला. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 42.5 टक्के वाढ पाहायला मिळाली.
निव्वळ कर संकलनात नॉन-कॉर्पोरेट कर संकलनाचे प्रमाण कॉर्पोरेट करच्या तुलनेत अधिक आहे. या कालावधीत नॉन-कॉर्पोरेट कर संकलन 21.5 टक्क्यांनी वाढून 8.74 लाख कोटी रुपये झाले, तर कॉर्पोरेट कर संकलन 8.1 टक्क्यांनी वाढून 7.68 लाख कोटी रुपये झाले आहे. नॉन-कॉर्पोरेट कर संकलनांमध्ये प्रामुख्याने वैयक्तिक आयकराचा समावेश असतो. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, सरकारद्वारे चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करातून 22.07 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. यामध्ये 10.20 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर संकलन, 11.87 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकर आणि इतर करांचा समावेश आहे.





