Direct tax collection : प्रत्यक्ष कर संकलनात 6% वाढ; 12 ऑक्टोबरपर्यंत 11.89 लाख कोटी रुपये जमा

नवी दिल्ली – कंपनी कर संकलनात झालेली भरघोस वाढ आणि कमी झालेला परतावा या कारणामुळे 12 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलनातून जमा झालेला कर सहा टक्क्यांनी वाढून 11.89 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या कालावधीत परतावा 16 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 2.03 लाख कोटी रुपये झाला असल्यामुळे निव्वळ कर संकलनात वाढ झाली आहे.
1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर या कालावधीत कंपनी कर संकलन वाढून 5.02 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 4.92 लाख कोटी रुपये होती. वैयक्तिक करदाते आणि अविभक्त हिंदू कुटुंबाकडून झालेले कर संकलन या कालावधीत वाढून 6.56 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 5.94 लाख कोटी रुपये होती.
रोखे विनिमय कर म्हणजे सिक्युरिटीज ट्रांजेक्शन टॅक्स संकलन किंचित वाढून 30,887 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 30,630 कोटी रुपये इतकी होती. या कालावधीत शेअर बाजारातील व्यवहारावर परिणाम झाल्यामुळे हे कर संकलन अपेक्षेइतके वाढले नसल्याचे दिसून येते.
परिणामी ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन ज्यामध्ये वैयक्तिक प्राप्तिकर आणि कंपनी कराचा समावेश असतो ते 6.33 टक्क्यांनी वाढून 11.89 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 11.18 लाख कोटी रुपये इतकी होती. परतावा वगळून झालेले ढोबळकर संकलन या कालावधीत वाढवून 13.92 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत झालेल्या ढोबळकर संकलनापेक्षा ही रक्कम 2.36 टक्क्यांनी जास्त आहे.
अर्थसंकल्पातील अपेक्षा –
या वर्षाच्या सुरुवातीला सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष कर संकलनातून पूर्ण वर्षात 25.20 लाख कोटी रुपये जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. गेल्या वर्षी झालेल्या कर संकलनापेक्षा ही रक्कम 12.7% वाढविण्यात आलेली आहे. यावर्षी रोखे विनिमय करातून सरकारला 78 हजार कोटी रुपयांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त कर संकलन झाले होते. एकूण परिस्थिती पाहता यावर्षीही अपेक्षेपेक्षा जास्त कर संकलन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





