Direct tax collection: प्रत्यक्ष कर संकलनात वाढ; मार्चच्या मध्यापर्यंत 21.26 लाख कोटींचे कर संकलन

नवी दिल्ली – दुसर्या आणि तिसर्या तिमाहीत विकासदर काही प्रमाणात मंदावला असला तरी आगामी काळ आशादायक असल्याचे वातावरण आहे. आगाऊ कर भरण्यात भरीव वाढ झाल्यामुळे 16 मार्चपर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 13 टक्क्यांनी वाढून 21.26 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
यावर्षी आगाऊ कर भरण्याच्या चार टप्प्यात सरकारला 10.44 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी ही रक्कम 9.11 लाख कोटी रुपये होती. त्यामध्ये 14.62 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या शेवटच्या टप्प्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 होती.
कंपनी कर वर्गातील आगाऊ कर भरणा 12.54 टक्क्यांनी वाढून 7.57 लाख कोटी रुपये झाला आहे. तर बिगर कंपनी वर्गातील आगाऊ कर भरणा 20.47 टक्क्यांनी वाढून 2.87 लाख कोटी रुपये झाला आहे. ज्या करदात्याची कर देता 10,000 रुपयापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींनी आगाऊ कर भरणा करणे अपेक्षित आहे. यामध्ये पगारी व्यक्तीचाही समावेश आहे. आगाऊ कर भरणा म्हणजे अॅडव्हान्स टॅक्स 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर, आणि 15 मार्चपूर्वी भरणे अपेक्षित असते.
प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या माहितीनुसार वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांकडून झालेले कर संकलन 17 टक्क्यांनी वाढून 11.01 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र कंपनी कर संकलन केवळ सात टक्क्यांनी वाढून 9.17 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजे कंपन्यांच्या घसरलेल्या नफ्याचा कर संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
शेअर बाजार निर्देशांक घसरले असले तरी रोखे विनिमय कराच्या माध्यमातून जमा झालेला कर 56 टक्क्यांनी वाढून 53,095 कोटी रुपये इतका झाला आहे. या कालावधीत करदात्यांना 4.68 लाख कोटी रुपयाचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षी ही रक्कम 3.47 लाख कोटी रुपये होती. 16 मार्चपर्यंत ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन 16 टक्क्यांनी वाढून 25.86 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. यावर्षी प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारला 12.57 लाख कोटी रुपये अपेक्षित आहेत. अर्थसंकल्पात 11.87 लाख कोटी रुपयांची अपेक्षा करण्यात आली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यामुळे यात वाढ करण्यात आली आहे.




