Nepal T20I Record : क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते नेपाळने करून दाखवलं! टी-२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
Nepal T20I Record : नेपाळने २० षटकांत २ गडी गमावून ३१३ धावा केल्या, ज्यात सलामीवीर कुशल भुरतेलने एकाच षटकात सहा षटकार मारत धमाकेदार शतक झळकावले.

Nepal Cricket T20I 313 Runs Record : टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज नवे विक्रम होत असतात, परंतु नेपाळच्या क्रिकेट संघाने आता जो पराक्रम केला आहे, तो आजवर जगातील कोणत्याही बलाढ्य संघाला जमलेला नाही. ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात नेपाळने चीनविरुद्ध धावांचा असा काही पाऊस पाडला की क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये एक नवा इतिहास लिहिला गेला. नेपाळने २० षटकांत तब्बल ३१३ धावा कुटून इतिहास रचला आहे. यासह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोनदा ३०० पेक्षा जास्त धावा करणारा नेपाळ हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
सलामीवीर कुशल भुर्तेलचे ३५ चेंडूंत शतक; एकाच ओव्हरमध्ये ठोकले ६ सिक्स!
सिंगापूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चीनने टॉस जिंकून नेपाळला आधी फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र, नेपाळच्या फलंदाजांनी चीनी गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. नेपाळने निर्धारित २० षटकांत केवळ २ विकेट्स गमावून ३१३ धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला. या ऐतिहासिक कामगिरीचा महानायक ठरला तो सलामीवीर कुशल भुर्तेल. कुशलने मैदानावर चौकार-षटकारांचे वादळ आणत अवघ्या ३५ चेंडूंत दमदार शतक ठोकले. विशेष म्हणजे, एकाच ओव्हरमध्ये सलग ६ षटकार (६ सिक्स) मारून त्याने क्रिकेट जगताला थक्क केले.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣
Nepal’s Kushal Bhurtel became only the fifth batter after Yuvraj Singh, Kieron Pollard, Dipendra Airee, and Manan Bashir to hit six sixes in an over in a Men’s T20I 🔥
He scored 129 off 43 balls in Nepal’s 221-run win over China in the Asian Games qualifier. pic.twitter.com/MXJjWlsOIP
— Circle of Cricket (@circleofcricket) May 31, 2026
नेपाळने टी-२० मध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मधील आशियाई खेळांमध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्ध ३१४/३ असा स्कोअर करत जगात पहिल्यांदा ३०० धावा करण्याचा विक्रम केला होता. आतापर्यंत क्रिकेट जगतात केवळ चारच संघांना टी-२० मध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत, पण दोनदा हा पराक्रम करणारा नेपाळ हा एकमेव संघ आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५ सर्वोच्च स्कोअर:
🚨 Teams to score 300+ twice in T20Is:
1️⃣ Nepal 🇳🇵
End of list. 😎 pic.twitter.com/YQ6ZLlkfn8
— Cricket in Asia (@ICCAsiaCrickett) May 31, 2026
३४४/४ – झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया
३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया
३१३/२ – नेपाळ विरुद्ध चीन
३०८/१ – जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया
३०४/२ – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
चीनचा ९२ धावांत खुर्दा; नेपाळचा २२१ धावांनी मोठा विजय –
३१४ धावांच्या हिमालयासारख्या लक्ष्याचा पाठलाग करताना चीनचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली आला. त्यांची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. केवळ शेनजियान झेंगने १५ चेंडूंत ३१ धावा करत थोडा संघर्ष केला, तर चीनचे तब्बल चार फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. नेपाळच्या धारदार गोलंदाजीसमोर चीनचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत अवघ्या ९२ धावांवर गारद झाला. नेपाळने हा सामना २२१ धावांच्या अवाढव्य फरकाने जिंकून आशियाई खेळांच्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे.





