काठमांडू : नेपाळमधील आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या जेन-जी च्या आंदोलकांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आंदोलकांपैकी ६ जणांचे मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये नेण्यात आले. चार आंदोलकांच्या मृतदेह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी बागमती नदीकिनारच्या पशुपतीनाथ येथे नेण्यात आले. भौतिक पायाभूत सुविधा मंत्री कुलमान घिसिंग आणि गृहमंत्री ओम प्रकाश अरयाल हे आंदोलकांच्या नातेवाईकांसह याप्रसंगी उपस्थित होते. आंदोलकांची अंत्ययात्रा काठमांडूमधील महाराजगंज येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटल येथून सुरू झाली. याच रुग्णालयात या आंदोलकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. तेथून ही अंत्ययात्रा पशुपती येथे हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवार आणि सोमवारी शवविच्छेदन केल्यानंतर उर्वरित मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांना शहिदाचा दर्जा दिला जाईल, असे हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांनी रविवारी जाहीर केले होते. प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल दुखवटा पाळण्यासाठी बुधवारी एक दिवसाची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. या काळात नेपाळचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. दिनांक ८ आणि ९ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये ७२ जण मरण पावले. त्यामध्ये १० कैदीही आहेत. दरम्यान आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम विविध मंत्रालयांकडून केले जाऊ लागले आहे. जाळली गेलेली वाहने, उपकरणे आणि मालमत्तेच्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. बाबरमल येथील रस्ते विभागाच्या इमारतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दोनच वर्षांपुर्वी १५ दशलक्ष रुपये खर्चून ही इमारत नव्याने बांधली होती.