Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघातात ५ ठार

Nepal Helicopter Crash – काठमांडूच्या वायव्येकडील पर्वतीय भागात बुधवारी हेलिकॉप्टर कोसळून चार चिनी पर्यटक आणि एक नेपाळी वैमानिक ठार झाला. काठमांडू आणि नुवाकोट जिल्ह्यांमधील सीमावर्ती भागात हा अपघात झाला.
एअर डायनेस्टी या खासगी विमान कंपनीच्या हेलिकॉप्टरमधील पायलटसह पाचही जण या अपघातात ठार झाले. नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी राष्ट्रीय उद्यान परिसरात हेलिकॉप्टर स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता काठमांडूपासून ३० किमी उत्तर-पश्चिम अंतरावर कोसळले.
हेलिकॉप्टर चार चिनी प्रवाशांसह काठमांडूहून रसुवाच्या स्याफ्रुबेसी भागाकडे जात होते. हेलिकॉप्टरने काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १.५४ वाजता उड्डाण केले आणि अवघ्या तीन मिनिटांतच टॉवरशी संपर्क तुटला, असे नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले.
या दुर्घटनेतील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी काठमांडू येथील महाराजगंज येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दोनच आठवड्यांपूर्वी सूर्या एअरलाईन्सचे विमान त्रिभुवन विमानतळावर कोसळले होते. त्यात १८ जण ठार झाले होते.





