नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले. या निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आहे. त्याला उत्तर देताना एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, आम्ही एलईडीचे बल्ब आणले. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटुंबाचे विजेचे बील दोन हजार रूपये कमी झाले आहे. कॉंग्रेसच्या काळात अडीच लाखपर्यंतच्या उत्पन्नावर कर होता. आता सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे देशातील कुटुंबांना बचत करण्याची संधी मिळाली आहे. देशातील जनतेला आज पाच लाखांपर्यंतचे आरोग्य उपचार मोफत उपलब्ध आहेत. त्याचाही कुटुंबांना फायदा होतो आहे. त्यांना औषधांवर जादा खर्च करावा लागत नाही आणि ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यांत जास्त महागाई इंदिरा गांधी सरकारच्या काळात होती. इंदिरा गांधी, नेहरू आणि राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेली भाषणे तुम्ही नक्की ऐका, आम्हाला फार काही सांगावे लागणार नाही. महागाईच्या मुद्द्यावर त्यावेळी नेहरू म्हणाले होते की यामुळे आम्ही आणि तुम्ही चिंतेत आहोत. मात्र सगळ्यांना हे माहिती असले पाहिजे की उत्तर आणि दक्षिण कोरियाचे युध्द सुरू आहे. त्यामुळे देशात महागाई वाढते आहे असे उदाहरण देत मोदींनी सांगितले की त्या काळी जागतिकिकरण झाले नव्हते. त्या युध्दाचा देशावर काय प्रभाव पडत होता? मात्र त्यावेळीही हे लोक कारणेच शोधायचे. आज अनेक ठिकाणी युध्द सुरू आहे. जी ठिकाणी तेल, खते, अन्नधान्य यासाठी ओळखली जातात. तेथे सुरू असलेल्या युध्दाचा थेट प्रभाव आपल्यावर पडतो. असे असूनही आम्ही पेट्रोल दरवाढ होऊ दिली नाही आणि महागाई नियंत्रणात ठेवली.