नीट पीजी परीक्षा ‘या’ दिवशी होणार; सर्वोच्च न्यायालयाने दिली एनबीईला मान्यता

NEET PG Exam | येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी नीट पीजी (पदव्युत्तर) परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (एनबीई) दिलेली पूर्वीची अंतिम मुदत वाढवली आहे. ही परीक्षा या वर्षी १५ जून रोजी होणार होती. न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, या संदर्भात एनबीईला कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही.
३० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, एनबीईने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून परीक्षा नंतरच्या तारखेला पुन्हा आयोजित करण्यासाठी वेळ वाढवण्याची मागणी केली होती, कारण सिंगल-शिफ्ट आदेशाचे पालन करण्यासाठी नवीन व्यवस्था करावी लागेल.
एनबीईने ३ ऑगस्टला एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या मंजुरीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. जी आता मंजूर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधीच देशभरात एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून निष्पक्षता आणि पारदर्शकता राखली जाईल.
युनायटेड डॉक्टर्स फ्रंटने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेनंतर हे प्रकरण समोर आले. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला की यामुळे स्पर्धकांसाठी असमान परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली. NEET PG Exam |
परीक्षा 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये होणार होती
ही परीक्षा यापूर्वी 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या स्वरूपावर आक्षेप घेतला आणि परीक्षा पुढे ढकलली. न्यायालयाने स्पष्ट केले होते की दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने काठिण्यपातळीत फरक होऊ शकतो, ज्यामुळे उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो.
सुमारे 1000 परीक्षा केंद्रांची आवश्यकता
एनबीईने त्यांच्या बाजूने म्हटले आहे की, 30 मे च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, 250 हून अधिक शहरांमध्ये परीक्षा केंद्रे एकाच वेळी घेणे आवश्यक असेल आणि 1,000 हून अधिक केंद्रे बुक करून सक्रिय करावी लागतील. त्यांनी त्यांच्या याचिकेत सांगितले आहे की परीक्षा आता 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत घेतली जाईल. ही तारीख त्यांच्या तांत्रिक भागीदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसद्वारे प्रदान केलेली सर्वात जवळची संभाव्य तारीख आहे. NEET PG Exam |
हेही वाचा:





