Lausanne Diamond League 2024 : नीरज चोप्राची चमकदार कामगिरी, ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडित काढत पटकावलं दुसरे स्थान…

Lausanne Diamond League 2024 (Neeraj Chopra) : भारताचा गोल्डन बाॅय म्हणजेच भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये संघर्ष केल्यानंतर नीरजने शेवटच्या थ्रोमध्ये 89.49 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स याने शेवटच्या थ्रोमध्ये 90.61 मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले.
नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात केवळ 82.10 मीटर भालाफेक करू शकला. दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने अधिक चांगले अंतर कापले आणि 83.21 मीटर अंतरावर भालाफेक केली. पाचव्या थ्रोपर्यंत, त्याची सर्वोत्तम थ्रो 83.21 मीटर होती, परंतु त्याने शेवटच्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान मिळविले. त्याने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 89.49 मीटर अंतराची नोंद केली. नीरजचा हा हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो आहे कारण याआधी 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा सर्वोत्तम थ्रो झाला होता, जिथे त्याने 89.45 मीटर अंतराची नोंद केली होती.
लुसाने डायमंड लीग 2024 मधील नीरज चोप्राचे थ्रो…
पहिला थ्रो – 82.10 मीटर
दुसरी थ्रो – 83.21 मीटर
तिसरा थ्रो – 83.13 मीटर
चौथा थ्रो – 82.34 मीटर
पाचवा थ्रो – 85.58 मीटर
सहावा थ्रो – 89.49 मीटर*
डायमंड लीग पॉइंट टेबल…
डायमंड लीगबद्दल सांगायचे तर डायमंड लीगच्या स्पर्धा वर्षातून चार ठिकाणी आयोजित केल्या जातात. या स्पर्धांचे आयोजन दोहा, पॅरिस, लॉसने आणि शेवटी झुरिच येथे केले जाते. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक पटकावला होता. पण 2024 च्या ऑलिम्पिकपूर्वी त्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये फिटनेसच्या कारणास्तव भाग घेतला नव्हता. डायमंड लीगमध्ये अव्वल स्थानावरील खेळाडूला 8 गुण तर दुसऱ्या स्थानावरील खेळाडूला 7 गुण मिळतात. त्याचप्रमाणे एक स्थान घसरल्याने गुणही कमी होत राहतात. म्हणजेच आता नीरज चोप्राला लुसानेमध्ये दुसऱ्या स्थानासह 7 गुण मिळाले आहेत.
नीरजकडे आता एकूण 14 गुण आहेत आणि एकूण गुणांच्या बाबतीत तो ज्युलियन वेबरसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसन पीटर्स 21 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर याकुब वालेश 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ज्युलियन वेबर आणि नीरज चोप्रा 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
डायमंड लीग गुणतालिका…
अँडरसन पीटर्स – 21 गुण (3 स्पर्धा)
याकुब व्हॅड्लेजच – 16 गुण (3 स्पर्धा)
नीरज चोप्रा – 14 गुण ( 2 स्पर्धा)
ज्युलियन वेबर – 14 गुण (2 स्पर्धा)
आर्थर फेलफ्नर – 9 गुण ( 2 स्पर्धा)
एड्रीयन मार्डारे – 8 गुण ( 3 स्पर्धा )
जेंकी डीन – 6 गुण ( 2 स्पर्धा)
अर्शद नदीम – 5 गुण ( 1 स्पर्धा)
ऑलिव्हर हेलँडर – 5 गुण ( 1 स्पर्धा )
ज्युलियस येगोक – 4 गुण ( 2 स्पर्धा)
एडिस मॅतुसेव्हेव्हिसियस – 3 गुण ( 1 स्पर्धा)
फायनल कधी होणार?
दरम्यान, डायमंड लीगमध्ये चौथी फेरी बाकी आहे, जी 5 सप्टेंबर रोजी झुरिचमध्ये होणार आहे. झुरिच फेरीनंतर गुणांच्या आधारे टॉप-6 मध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये अंतिम सामना होईल. डायमंड लीगचा अंतिम सामना 13-14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये खेळवला जाईल. यापैकी एका तारखेला भालाफेकचा अंतिम सामनाही खेळवला जाईल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते रौप्य पदक….
लुसने डायमंड लीग 2024 च्या यशाच्या दोन आठवडे आधी नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा झेंडा फडकावला होता. नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. केवळ पाकिस्तानचा अर्शद नदीम त्याच्या पुढे होता, ज्याने 92.97 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले नाही तर ऑलिम्पिक विक्रमही मोडला होता. यासह नीरज कोणत्याही दोन ऑलिम्पिक अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
Top 5 : नीरज चोप्राचे कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो
1. स्टॉकहोम डायमंड लीग 2022, (जून 30, 2022) : 89.94 मी.
2. लुसाने डायमंड लीग 2024, (ऑगस्ट 22, 2024) : 89.49 मी.
3. पॅरिस ऑलिंपिक 2024 (अंतिम फेरी), (ऑगस्ट 8, 2024) : 89.45 मी.
4. पॅरिस ऑलिंपिक 2024 (पात्रता फेरी), (ऑगस्ट6, 2024) : 89.34 मी.
5. पावो नुर्मी गेम्स 2022(तुर्कू), (14 जून, 2022) : 89.30 मी.





