Neeraj Chopra : दोहा डायमंड लीगमध्ये नीरजची चौथ्या स्थानावर सांगता; राष्ट्रकुल स्पर्धेचा पात्रता टप्पा केला पार
पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाची सुरुवात करण्यास उशीर झालेल्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दोहा डायमंड लीग स्पर्धेत चौथ्या स्थानावर आपली मोहीम फत्ते केली आहे.

Neeraj Chopra : पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाची सुरुवात करण्यास उशीर झालेल्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दोहा डायमंड लीग स्पर्धेत चौथ्या स्थानावर आपली मोहीम फत्ते केली आहे.
२८ वर्षीय नीरजने शुक्रवारी रात्री झालेल्या या मोसमातील आपल्या पहिल्याच स्पर्धेत ८५.६९ मीटरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पहिल्या दोन स्थानांमध्ये स्थान न मिळवण्याची गेल्या चार वर्षांतील नीरजची ही पहिलीच वेळ ठरली.
स्पर्धेत नीरजची सुरुवात ‘फाऊल’ने झाली, परंतु दुसऱ्या फेरीत त्याने ८२.७७ मीटर अंतराचा थ्रो करून पुनरागमन केले. या कामगिरीसह त्याने ‘ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’ने निश्चित केलेले ८२.६१ मीटरचे पात्रता अंतर पार केले आणि २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील (२३ जुलै ते २ ऑगस्ट) आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले.
सप्टेंबर २०२५ मध्ये टोकियो जागतिक स्पर्धेत आठवे स्थान मिळाल्यानंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा होती. स्पर्धेनंतर नीरजने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना पुनरागमनाचा आनंद व्यक्त केला. त्याने सोशल मिडियावर दिलेल्या संदेशामध्ये, मैदानावर परतल्याचा आनंद आहे. ८५.६९ मीटरची कामगिरी चांगली वाटली आणि मी पुढील हंगामासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
श्रीलंकेच्या पाथिराजचे वर्चस्व
दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत श्रीलंकेचा २३ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या रुमेश थरंगा पाथिराज याने ८८.६८ मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावले. पहिल्या तीन प्रयत्नांत साधारण कामगिरी करणाऱ्या पाथिराजने चौथ्या फेरीत ८८.६८ मीटरचा धडाकेबाज थ्रो करून आघाडी घेतली.
रोम डायमंड लीगमधील ९२.६२ मीटरच्या विक्रमानंतर पाथिराजचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह चोप्रा आणि पाथिराज यांच्यातील परस्पर लढतींचा (हेड-टू-हेड) विक्रम आता श्रीलंकन खेळाडूच्या बाजूने २-१ असा झाला आहे.
या स्पर्धेत ग्रेनाडाचा दोनवेळचा जागतिक विजेता अँडरसन पीटर्स ८६.३८ मीटरसह दुसऱ्या, तर अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन ८५.९९ मीटरसह तिसऱ्या स्थानावर राहिला. दुखापतीमुळे लयीवर झालेल्या परिणामामुळे नीरजला गेल्या वर्षीप्रमाणे (९०.२३ मीटर) कामगिरी करता आली नसली, तरी आगामी मोठ्या स्पर्धांसाठी त्याचे हे पुनरागमन आश्वासक मानले जात आहे.






