Javelin Throw : गोल्डनबॉय नीरज चोप्रा लवकरच पुन्हा एकदा दिसणार ॲक्शनमध्ये, ‘या’ लीगमध्ये सहभागी होण्याचा घेतला निर्णय…

Lausanne Diamond League 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर भाला फेक करून रौप्यपदक जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लवकरच पुन्हा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर दुखापतीमुळे पूर्ण फॉर्ममध्ये नसल्याचे वक्तव्य करणारा नीरज आता 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लुसाने डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे.
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान आपल्या वक्तव्यात सांगितले होते की, त्याला बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत खेळायचे आहे. सध्या स्वित्झर्लंडमध्ये उपस्थित असलेल्या नीरजने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी 22 ऑगस्ट रोजी लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. अंतिम सामना खेळण्यासाठी नीरजला लुसाने किंवा त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी ज्युरिख येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या ग्रुप स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत नीरजने आता लुसानेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
#WATCH | On his plans post his Olympic stint, Neeraj Chopra says, “… I have finally decided to participate in the Lausanne Diamond League, which begins August 22.” pic.twitter.com/euMxssIYak
— ANI (@ANI) August 17, 2024
पॅरिसनंतर माझी दुखापत पूर्वीपेक्षा चांगली…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या दुखापतीबाबत नीरज चोप्राने वक्तव्य केले होते. आता त्याने सांगितले की, “पॅरिसनंतर चांगली गोष्ट म्हणजे माझी दुखापत जास्त गंभीर झाली नाही. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान माझ्या फिजिओने या दुखापतीवर उपचार केले होते, त्यामुळे स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे.”
पुढे तो म्हणाला की, “याआधी मी असा विचार केला होता की ज्यूरिख डायमंड लीगमध्ये भाग घेईन. पण आता दुखापत बरी असल्याने मी लुसानेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, नीरज चोप्राने 2022 साली डायमंड लीगची फायनल जिंकली होती. यावेळी फायनल 13 आणि 14 सप्टेंबरला होणार आहे.





