Neena Gupta : नीना गुप्तांनी OTT आणि सिनेमातील फरकावर मांडले स्पष्ट मत; म्हणाल्या…
Neena Gupta : 'पंचायत सीझन ५'च्या पहिल्या एपिसोडचा वर्ल्ड प्रीमियर ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2026) पार पडला. या खास सोहळ्याला अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेता फैसल मलिक उपस्थित होते.

Neena Gupta : ‘पंचायत’ या लोकप्रिय वेबसीरिजने आपल्या साध्या, हलक्याफुलक्या कथानकातून आणि दमदार व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या मालिकेच्या आगामी पाचव्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता नव्या सीझनच्या निमित्ताने पुन्हा एकदा फुलेरा गावातील धमाल आणि विनोदाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
‘पंचायत सीझन ५’च्या पहिल्या एपिसोडचा वर्ल्ड प्रीमियर ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2026) पार पडला. या खास सोहळ्याला अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेता फैसल मलिक उपस्थित होते. स्क्रीनिंगपूर्वी दोघांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मनोरंजनविश्वातील बदलत्या ट्रेंड्सवरही भाष्य केले.
OTT आणि सिनेमात फरक नसावा; नीना गुप्तांचे स्पष्ट मत
यावेळी नीना गुप्ता यांनी ओटीटी आणि चित्रपट या दोन माध्यमांमधील फरकाबाबत आपले मत मांडले. ओटीटी आणि सिनेमाकडे वेगवेगळे माध्यम म्हणून पाहण्याची गरज नाही. अखेरीस दोन्ही माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत मनोरंजन पोहोचवले जाते, असे त्या म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या नीना गुप्ता?
“ओटीटी आणि सिनेमामध्ये आता कोणताही भेद नसावा, कारण शेवटी ते एकच माध्यम आहे. चित्रपटसृष्टीत एखादा ट्रेंड लोकप्रिय झाला की काही काळ प्रत्येकजण त्याच प्रकारचा आशय तयार करू लागतो. मात्र, काही काळानंतर तो ट्रेंड संपतो आणि नवीन ट्रेंड सुरू होतो.” असे भाष्य नीना गुप्ता यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, “एक काळ असा होता, जेव्हा ‘यंग अँग्री मॅन’ प्रकारचे चित्रपट लोकप्रिय होते. त्यानंतर दुसरेच विषय पुढे आले. त्यामुळे हे एक चक्र आहे. गोष्टी सतत बदलत असतात. कोणी येतं, कोणी जातं.”
‘पंचायत’ला मिळालेल्या प्रेमामुळे फैसल मलिक उत्सुक
दरम्यान, अभिनेता फैसल मलिक यानेही IFFI मधील ‘पंचायत’च्या प्रीमियरबाबत आनंद व्यक्त केला. या वेबसिरीजला यापूर्वीही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले असून तिने सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कारही पटकावला असल्याचे त्याने नमूद केले.
मालिकेच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत फैसलने पाचव्या सीझनच्या प्रीमियरबाबत उत्सुकता व्यक्त केली. ‘पंचायत’च्या नव्या सीझनलाही प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. एकूणच ‘पंचायत ५’च्या सीझनमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे.





