Shraddha Kapoor : कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूर भावुक; अंबाबाईच्या दर्शनाला आली अन् म्हणाली…
श्रद्धा कपूरचा आगामी 'ईठा' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे.

Shraddha Kapoor : बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत वावरणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर जेव्हा मराठमोळ्या रूपात चाहत्यांसमोर आली, तेव्हा तिच्या सौंदर्याची चर्चा होणं साहजिकच होतं. पण यावेळी केवळ तिच्या नऊवारी साडीची किंवा पारंपरिक लूकचीच चर्चा झाली नाही, तर कोल्हापूरकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमाने श्रद्धाचं मनही जिंकलं.
कोल्हापुरात पोहोचलेल्या श्रद्धाने आधी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी मिळालेलं प्रेम पाहून ती इतकी भारावली की, ‘मला कोणीतरी रूम देणार का? आता मला इथून जावंसंच वाटत नाही,’ असं ती मजेशीरपणे म्हणाली.
श्रद्धा कपूरने कोल्हापूर भेटीदरम्यान खास मराठमोळा पेहराव केला होता. लाल रंगाची नऊवारी साडी, हातात लाल-हिरव्या बांगड्या, नाकात पारंपरिक नथ, गळ्यात सुंदर दागिने आणि केसांत मोगऱ्याचा गजरा असा तिचा लूक होता. या लूकला कोल्हापुरी चपलांचीही जोड होती. तिच्या या पारंपरिक रूपाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
अभिनेत्रीने अंबाबाई मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच या चित्रपटाच्या यशासाठी देवीचा आशीर्वाद मागितला. दर्शनानंतर तिने मंदिरातील काही खास फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. ‘आई अंबाबाई, तुझ्या दर्शनासाठी थँक्यू… कोल्हापूर’, अशा आशयाचे कॅप्शनही तिने दिले. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोल्हापूरकरांच्या प्रेमाने श्रद्धा भारावली; स्टेजवरून मानले आभार
कोल्हापूरमधील कार्यक्रमात श्रद्धाने उपस्थित चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूरकरांनी दिलेला प्रतिसाद आणि प्रेम पाहून ती चांगलीच भावूक झाली. स्टेजवरून बोलताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. चाहत्यांचे आभार मानताना ती म्हणाली, “एवढं प्रेम… मी तुम्हाला एक सांगू, मी तुम्हा सर्वांना बाहेरून बघितलं. एवढं प्रेम मला तुम्ही दिलं. माझे डोळे भरून आलेत. खरंच माझं मन खूपच भरून आलंय.”
पुढे ती म्हणाली, “खरंच तुमचं प्रेम पाहून माझं मन भरून आलं आहे. आता मला खूप जास्त ओव्हरव्हेल्मिंग वाटतंय. आणि मला नाही वाटत की मी इथून जाईन आता. मला कोणीतरी रूम देणार का आता? खरंच, थँक्यू, थँक्यू सो मच!” श्रद्धाच्या या बोलण्याने उपस्थित चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, श्रद्धा कपूरचा आगामी ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे.
विशेष म्हणजे, हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित बायोपिक आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत रणदीप हुड्डाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.






