Archana Puran Singh : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पोहचली सेटवर; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ खास किस्सा म्हणाली “कल्पना करा, एका रात्री लग्न करायचं आणि…”
Archana Puran Singh : 'धमाल विथ पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये अर्चना पूरण सिंह आणि तिचा पती परमीत सेठी सहभागी झाले होते. यावेळी अर्चनाने त्यांच्या लग्नातील आठवणींना उजाळा देत एक खास किस्सा सांगितला. दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी लग्नाचा कोणताही मोठा सोहळा आयोजित केला नव्हता. अगदी साध्या पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली.

Archana Puran Singh : मनोरंजनविश्वातील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना नेहमीच कुतूहल असते. त्यांच्या प्रेमकथा, लग्न आणि आयुष्यातील खास प्रसंग जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता असते. अशातच अभिनेत्री अर्चना पूरण सिंह हिने तिच्या लग्नाशी संबंधित एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. कुटुंबीयांचा विरोध असतानाही अर्चना आणि अभिनेता परमीत सेठी यांनी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्चनाला शूटिंगसाठी सेटवर हजर राहावे लागले होते.
कुटुंबीयांचा विरोध झुगारून उरकले गुपचूप लग्न
‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये अर्चना पूरण सिंह आणि तिचा पती परमीत सेठी सहभागी झाले होते. यावेळी अर्चनाने त्यांच्या लग्नातील आठवणींना उजाळा देत एक खास किस्सा सांगितला. दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी लग्नाचा कोणताही मोठा सोहळा आयोजित केला नव्हता. अगदी साध्या पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली.
या निर्णयाबद्दल बोलताना अर्चनाने सांगितले की, त्यांच्या लग्नाला कोणताही थाटमाट नव्हता. त्या वेळी फक्त ते दोघे एकत्र होते आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ देण्याचा त्यांचा निर्धार होता.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी शूटिंगला हजेरी
अर्चनाच्या लग्नातील सर्वात रंजक प्रसंग म्हणजे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिला शूटिंगसाठी सेटवर जावे लागले होते. सेटवर पोहोचायला तिला अवघ्या पाच मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे दिग्दर्शकाने तिच्यावर नाराजी व्यक्त करत उशिरा येण्याबाबत जाब विचारला. त्यावेळी अर्चना दिग्दर्शकाला म्हणाली, “सर, माझं काल रात्रीच लग्न झालं.”
गुप्त लग्नाची आठवण आजही खास
त्या दिवसांची आठवण सांगताना अर्चना म्हणाली, “कल्पना करा, एका रात्री लग्न करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद संपूर्ण जगापासून लपवून ठेवायचा! आज जेव्हा परमीत आणि मी मागे वळून त्या दिवसांची आठवण काढतो, तेव्हा आमचं ते गुप्त लग्न आयुष्याची सर्वात फिल्मी आणि खास सुरुवात वाटते. अशी सुरुवात होईल, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती.”
अर्चना आणि परमीत यांची प्रेमकहाणी ही केवळ लग्नाच्या आठवणींपुरती मर्यादित नाही. कुटुंबीयांचा विरोध असतानाही एकमेकांची साथ देण्याचा घेतलेला निर्णय, गुपचूप केलेले लग्न आणि दुसऱ्याच दिवशी कामावर हजर राहण्याचा प्रसंग आजही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी ठरल्या आहेत.
अर्चनाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये केले काम
अर्चना पूरण सिंह हिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘निकाह’, ‘जलवा’, ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आशिक आवारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तिने परीक्षकाची भूमिका बजावली आहे. कामातून वेळ काढून कुटुंबासोबतही वेळ घालवण्याचा ती सातत्याने प्रयत्न करत असते.
King Film: शाहरुख खान-करिना कपूर 15 वर्षानंतर एकत्र; ‘डॅडी कूल’ नवं गाणं रिलीज





