Olympics 2028 : ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या अधिक सहभागासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक – गगन नारंग

पॅरिस – भारतीय खेळाडूंनी ३३ व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. काही पदकांची थोडक्यात हुलकावणी दिली. स्पर्धेत झालेल्या चुकांमधून शिकून पुढे जाणे गरजेचे आहे. याचबरोबरीने एक सक्षम क्रीडा संस्कृती निर्माण करून भारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग वाढविला पाहिजे, असे मत ऑलिम्पिक मोहिमेचे प्रमुख गगन नारंग यांनी व्यक्त केले.
पॅरिसमध्ये नुकतीच ३३ वी ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय संघाने १ रौप्य व ५ कांस्य असे एकूण ६ पदके जिंकली. भारताला नेमबाजीतून ३ तर हॉकी, कुस्ती व भालाफेक यातून तीन पदके मिळाली. या स्पर्धेसाठी ११७ खेळाडूंनी १६ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता.
याविषयावर बोलताना गगन नारंग म्हणाले, आपल्याला सहा पदके मिळाली आहेत. मात्र काही पदके अजून मिळायला हवी होती. काही ठिकाणी भारतीय खेळाडू चौथ्या स्थानी राहिले. तर काही खेळाडूंनी अंतिम फेरीत देखील स्थान मिळविले होते. मात्र, ते देशासाठी पदक मिळवू शकले नाहीत.
आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त पदके मिळवावीत यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी आतापासून सक्षम क्रीडा संस्कृती विकसित करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. सक्षम क्रीडा संस्कृतीमुळे खेळाडूना अजून चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. याचबरोबरीने राष्ट्रीय क्रीडा महासंघाने देखील खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असे नारंग म्हणाले.
पुनरागमन कसे करायाचे ? ते शिकवणार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सहा खेळाडूंना चौथ्या स्थानावर राहावे लागले. केवळ काही गुणांमुळे त्यांचे ऑलिम्पिक पदक हुकले होते. यावर बोलताना नारंग म्हणाले, आम्ही खेळाडूंना कसे जिंकायचे हे शिकवत असतो, आता आम्ही खेळाडूंना पराभव स्वीकारून कसे पुनरागमन करायचे याचे मार्गदर्शन करणार आहोत. यामुळे थोडक्यात पदक हुकलेल्या खेळाडूंना नवीन हुरूप येणार असून ते पुढील स्पर्धेत अजून चांगली कामगिरी करून दाखवू शकतील.
निरीक्षणांच्या नोंदीचा अहवाल
नेमबाज गगन नारंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी मोहीम प्रमुख म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली. या संदर्भातील एक विस्तृत अहवाल ते भारतीय ऑलिम्पिक संघटना व क्रीडा मंत्रालयाकडे सुपूर्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दशकात भारताने क्रीडा क्षेत्रात मोठा पाळला गाठला आहे. जागतिक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंकडे आता आव्हान म्हणून पाहिले जात आहे. असे असून देखील अजूनही सुधारणांवर काम करणे आवश्यक आहे. यासाठी अजून तांत्रिक गोष्टी विकसित केल्यास अमेरिका आणि चीन सारख्या देशांचा सामना अजून नेटाने करू शकू, असे नारंग म्हणाले.



