काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरसाठी पुन्हा बोली लावण्याची आवश्यकता; मुंबई उच्च न्यायालयाचे मत

मुंबई – देणेकऱ्याची देणी चुकती करण्यासाठी माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरची विक्री करण्याची प्रक्रिया या अगोदर झाली होती. मात्र यासाठी ज्या निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोणीही भाग घेतला नाही. त्यामुळे यासंदर्भात बोली लावण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
या अगोदर कॉर्पोरेट ट्रस्टी विस्त्रा आयटीसीएल या कंपनीचे देणे चुकते करण्यासाठी काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरची विक्री करण्यासाठी बोली लावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या कालावधीत हे शेअर खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यासंदर्भात न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी सांगितले की, फेरबोलीसाठी 19 जुलै रोजी न्यायालय पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यावेळी इतर तपशील ठरेल.
गेल्या वर्षी काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी व्याजासह विस्त्रा आयटीसीएल कंपनीला 780 कोटी रुपये देणे होते. काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर विकून हे देणे चुकते करावे अशी मागणी विस्त्रा कंपनीने केली होती आणि न्यायालयाने ती स्वीकारली होती. मे महिन्यामध्ये काकडे यांनी यासाठी वेळ मागून घेतला.आपल्याला कर्ज मिळणार आहे. त्यातून हे देणे चुकते करू. त्यासाठी शेअरची विक्री करण्याची वेळ लांबवावी असे काकडे यांनी म्हटले होते. त्यानुसार चार जुलैपर्यंत तारीख देण्यात आली होती. मात्र तरीही देणे न आल्यामुळे विस्त्राने पुन्हा शेअरची बोली लावण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यानंतर होणाऱ्या सुनावणीवेळी काकडे यांना उपस्थित राहावे असे न्यायालयाने सांगितले आहे.





