भारतीय शेतकऱ्यांची गरिबी दूर करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि जैविक ऊर्जेची गरज – नितीन गडकरी

नवी दिल्ली – भारतीय शेतकरी पुरेसे यांत्रिकीकरण झाले नसताना कष्ट करून उत्पादन घेतात. मात्र जागतिक पातळीवरील दर कमी असल्यामुळे भारतीय शेतकर्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाचे दर पुरेशे मिळत नाहीत. यामुळे भारतीय शेतकरी गरीब आहे. यासाठी शेतकर्यांना सरकारच्या मदतीची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
ब्राझील जागतिक पातळीवरील साखरेचे दर ठरवतो. खाद्य तेलाच्या किमती मलेशियात ठरतात. मक्याच्या किमती अमेरिकेत ठरतात.सोयाबीनच्या किमती अर्जेंटिनात ठरतात. कारण ते देश संबंधित कृषी उत्पादनाचे उत्पादन यांत्रिकीकरणाद्वारा करतात. हीच उत्पादने भारतीय शेतकरी घेतात. मात्र भारतीय शेतकर्यांचा उत्पादनाचा खर्च जास्त असतो.
अशा परिस्थितीत भारतीय शेतकर्यांच्या कृषी उत्पादनांना त्यांच्या गुंतवणुकीइतका भाव मिळत नाही. त्यामुळे ते गरीब राहतात. यासाठी सरकारच्या पुढाकारांची गरज आहे. जैविक ऊर्जे संदर्भातील तंत्रज्ञानावरील परिषदेत बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आपण जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग झालो आहोत. त्यामुळे जागतिक नियमानुसार कृषी उत्पादनाचे भाव ठरतात. ते कमी असतात. अशा परिस्थितीत ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे ते गरीब होत चालले आहेत.
भारतीय शेतकर्यांच्या गरिबीचे कारण म्हणजे शेतीचे राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण केवळ 14% आहे. तर या 14% उत्पन्नावर खेड्यातील 65 टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे खेड्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न कमी आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मका उत्पादन करणार्या शेतकर्यांना जास्त भाव मिळत आहे.
इथेनॉल बनवण्याच्या अगोदर मक्याला 1,200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. तो आता 2,800 रुपये प्रति क्विंटल पातळीवर गेला आहे. यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त 45 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. थोडक्यात कृषी उत्पादनाचा खाद्यांन्नाबरोबरच उर्जेसाठी वापर केल्यानंतर शेतकर्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. असाच प्रकार उसाच्या बाबतीतही आहे.
ऊर्जेच्या निर्यातीचे लक्ष –
एकीकडे शेतकर्यांच्या उत्पादनांना किंमत कमी मिळत असताना दुसरीकडे भारताला आपल्या गरजेच्या 85% इतके खनिज तेल आयात करावे लागते. यासाठी परकीय चलन मोजावे लागते. जर कृषी उत्पादनाचा उपयोग ऊर्जेसाठी केला तर देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होईल. या क्षेत्रात आपण निर्यातही करू. जेव्हा आपण ऊर्जेचे निर्यात करू तेव्हा तो आपला ऐतिहासिक विजय ठरेल असे ते म्हणाले.





