हिंद महासागर प्रदेशात विकासासाठी समन्वयाची गरज : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

मस्कत : हिंद महासागर खरोखरच जागतिक लाईफलाईन आहे. या प्रदेशातील देशांचा विकास, संलग्नता, सागरी आणि सुरक्षिततेच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी देशांनी एकमेकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. मस्कत येथे ८ व्या हिंद महासागर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. सागरी भागीदारीतील नवीन क्षितिजांच्या दिशेने प्रवास अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
हिंद महासागर खरोखर जागतिक लाईफलाईन आहे. आजचे जग जसा प्रवास करत आहे, त्यासाठी येथील उत्पादकता, वापर, योगदान आणि संलग्नता केंद्रस्थानी आहे. इतिहास, भूगोल, राजकीय किंवा सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने हिंद महासागरात समन्वयाने प्रवास केल्यास हा प्रवास नवीन क्षितिजाच्या दिशेने जाणारा सर्वोत्तम प्रवास असेल.
मात्र त्यासाठी हिंद महासागराच्या भल्यासाठी समान योगदान देणे गरजेचे आहे. अस्थिर आणि अनिश्चिततेच्या काळामध्ये आम्हाला स्थैर्य आणि सुरक्षितता हवी आहे. मात्र त्यापुढेही आकांक्षा आणि अपेक्षांची पुर्तता व्हायची अपेक्षा आहे, असेही जयशंकर म्हणाले. हिंद महासागर प्रदेशात तणाव वाढतो आहे.
ग्लोबल साऊथच्या अन्य क्षेत्रांमध्येही तणाव आणि आर्थिक संकटांचा तणाव आहे. या भागातील अनेक देशांना स्थायी विकासाचे उद्दिष्टही गाठता येऊ शकत नाही. कर्जाचे ओझे ही फार मोठी चिंतेची बाब आहे. त्याबरोबर दशकांपासूनच्या वसाहतींच्य कालखंडात विस्कटलेल्या संलग्नतेची फेरबांधणी करणे हे देखील मोठे आव्हान आहे, असेही जयशंकर यांनी नमूद केले.
स्वायत्त आर्थिक क्षेत्रावरील देखरेख आणि मत्स्योद्योगाचे हित बघितले जाणे गरजेचे आहे. या क्षेत्रात अवैध तस्करी आणि दहशतवाच्या धोक्यामुळे सागरी सुरक्षेवरही परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.




