परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार; 15-16 ऑक्टोबरला एससीओ बैठकीत सहभागी होणार

नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये एससीओ कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटच्या (सीएचजी) बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे. 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांचा दौरा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न जयस्वाल यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले की भारत एससीओ चार्टरसाठी वचनबद्ध आहे. जयशंकर यांच्या भेटीचे हे कारण आहे. यावरून दुसरा अर्थ काढू नये.
29 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटीसाठी आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
यानंतर 30 ऑगस्टला मोदींना मिळालेल्या निमंत्रणाशी संबंधित एका प्रश्नावर जयशंकर म्हणाले होते, “पाकिस्तानशी चर्चेचे युग संपले आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येक काम लवकर किंवा उशिरा संपते.
जोपर्यंत जम्मू-काश्मीरचा प्रश्न आहे, आता कलम 370 हटवण्यात आले आहे, म्हणजे हा मुद्दा संपला आहे, आता आम्ही पाकिस्तानशी संबंधांचा का विचार करावा?, असा सवालही त्यांनी विचारला होता.
पंतप्रधान मोदी यांनी अखेरची लाहोरला 2015 मध्ये अचानक भेट दिली होती. तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. यानंतर डिसेंबर 2015 मध्ये भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला भेट दिली होती.
त्यांच्या दौऱ्यानंतर भारताचे एकही पंतप्रधान किंवा मंत्री पाकिस्तानला गेले नाही. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक झालेली नाही.





